Mann Ki Baat: उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 100 व्या भागाचे प्रक्षेपण; भाषण ऐकण्यासाठी मुंबईमध्ये BJP कडून 5000 ठिकाणी व्यवस्था

पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत महिला कारागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Prime Minister Narendra Modi (PC - Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या ‘मन की बात’ (Mann Ki Baat) कार्यक्रमाचे 100 वे प्रक्षेपण उद्या होणार आहे. हे भाषण ऐकण्यासाठी मुंबई भाजपने शहरातील 5000 ठिकाणी व्यवस्था केली आहे, असे शहर भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले. आज मुंबईत असलेले केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनीही लोकांना हा कार्यक्रम ऐकण्याचे आवाहन केले.

याबाबत शेलार म्हणाले की, ‘या कार्यक्रमामुळे पंतप्रधान आणि सामान्य जनता यांच्यात एक विशेष नाते निर्माण झाले आहे. ही बाब कार्यक्रमाबद्दल लोकांची आत्मीयता दर्शवते. मुंबईतील भाजपचे सर्व खासदार, आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी मुंबईतील आपापल्या भागात या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.’ या कार्यक्रमाबाबत मुंबईमध्ये भाजपने व्यापक व्यवस्था केली आहे.

मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 100 कार्यक्रम होणार आहेत. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत महिला कारागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील महिला गृह मदतनीस, महिला बचत गट व लघु महिला उद्योजक, महिला सफाई सेविका, अंगणवाडी सेविका, मुस्लिम महिला, महिला रिक्षाचालक यांना या कार्यक्रमासाठी खास आमंत्रित करण्यात आले आहे. या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते होणार आहे.

दहिसर विधानसभा मतदारसंघात मनीषाताई चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पाच हजार नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. भाजप मुंबई युवा मोर्चाच्या वतीने प्रथमच मतदारांना आमंत्रित करण्यात आले आहे. ओबीसी मोर्चाच्या वतीने 50 चहाच्या टपऱ्यांवर लोकांना मोफत चहा वाटण्यात येणार आहे. अल्पसंख्याक आघाडीच्या माध्यमातून प्रमुख दर्गे, मदरसे आणि उर्दू शाळांमध्ये शीर-कुर्माचे वाटप केले जाईल, असे शेलार यांनी सांगितले.

शेलार यांनी पुढे सांगितले की, पक्षाच्या कायदेशीर सेलचा ईशान्य मुंबईत वकिलांसह एक कार्यक्रम होणार आहे, पश्चिम महाराष्ट्र आघाडीचा डब्बावाल्यांसोबत कार्यक्रम असेल, दक्षिण भारतीय सेलने वरळीत महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केला आहे, उत्तराखंड सेलचे 200 नागरिक पारंपारिक वेशभूषेत सहभागी होणार, कामगार आघाडी संयुक्त महाराष्ट्र सभागृहात कार्यक्रम करणार आहे, तर कल्चरल सेलच्या वतीने आधार कार्ड व मतदार ओळखपत्राच्या कार्यक्रमासोबत शिबिरही होणार आहे. (हेही वाचा: Dhule-Dadar Special Express: केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी केलं धुळे-दादर विशेष एक्स्प्रेस रेल्वेचं उद्धाटन)

मतदारसंघनिहाय कार्यक्रमाची माहिती देताना शेलार म्हणाले की, बोरिवलीमध्ये 151, दहिसरमध्ये 308, मागाठाणेमध्ये 130, कांदिवली (पूर्व) येथे 400, चारकोपमध्ये 140, मालाड (पश्चिम) येथे 150, जोगेश्वरीत 90, दिंडोशीमध्ये 135, गोरेगावमध्ये 180, वर्सोवामध्ये 135, अंधेरी (पश्चिम) 180, अंधेरी (पूर्व) मध्ये 120, मुलुंडमध्ये 100, विक्रोळीमध्ये 160, भांडुप (पश्चिम) मध्ये 150, घाटकोपर (पश्चिम) मध्ये 70, घाटकोपर (पूर्व) येथे 90, मानखुर्द शिवाजीनगरमध्ये 120, विलेपार्ले येथे 200, चांदिवलीमध्ये 140, कुर्ला येथे 200, कलिना येथे 131, वांद्रे (पूर्व) येथे 125, वांद्रे (पश्चिम) येथे 120, अणुशक्ती नगरमध्ये 100, चेंबूरमध्ये 100, धारावीमध्ये 125, सायन कोळीवाड्यात 150, वडाळ्यात 100, माहीममध्ये 100, वरळीमध्ये 100, शिवडीमध्ये 100, भायखळ्यामध्ये 100, मलबार हिलमध्ये 100, मुंबादेवीमध्ये 100 आणि कुलाबामध्ये 100 कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.