नवी मुंबई: आज अनेक भागात पाणी कपात

नवी मुंबईतील अनेक शहरांमध्ये आज (सोमवार, 4/2/2019) सकाळी 10 ते 5 या वेळेत पाणी कपात होणार असल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

Water supply | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

नवी मुंबईतील अनेक शहरांमध्ये आज (सोमवार, 4/2/2019) सकाळी 10 ते 5 या वेळेत पाणी कपात होणार असल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेने (Navi Mumbai Municipal Corporation) दिली आहे. मंगळवारी (5/2/109) देखील पाणी कमी दाबाने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भोकरपाडा वॉटर ट्रीटमेंट प्लांट (Bhokarpada water treatment plant) येथे सुरु असलेल्या इलेक्ट्रीक दुरुस्तींमुळे पाणीकपात करण्यात येणार आहे.

या दुरुस्ती कामामुळे होणाऱ्या पाणीटंचाईचा फटका वाशी, सानपाडा, नेरुळ, बेलापूर, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या भागांना बसणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रीक कामामुळे निर्माण होणाऱ्या पाणीकपातीच्या अडचणीला नागरिकांना सहकार्य दाखवावे आणि पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

मोर्बे धरणातून येणारे पाणी भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्धीकरण करुन शहरातील विविध भागांत पाठवले जाते. इलेक्ट्रीक दुरुस्ती झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत होणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

नवी मुंबई शहराची लोकसंख्या सुमारे 14 लाखांच्या घरात असून मोर्बे धरणातून सुमारे 420 मिलियन लिटर पाणी दररोज नवी मुंबईच्या विविध भागात पुरवले जाते.