Shiv Sena Dussehra Rallies: दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या वाहतूकीत मोठ्या प्रमाणात बदल, 'हे' रस्ते असणार पुर्णपणे बंद
सुमारे तीन ते चार हजार बसेस आणि दहा ते बारा हजार छोटी-मोठी वाहने मुंबईत येण्याची शक्यता आहे.
मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) आणि शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) आणि उद्धव ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray Group) स्वतंत्र दसरा मेळाव्या (Dasara Melawa) आहेत. महाराष्ट्रभरातून लाखो लोक आज मुंबईत दाखल होत आहेत. सुमारे तीन ते चार हजार बसेस आणि दहा ते बारा हजार छोटी-मोठी वाहने मुंबईत येण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत शहरातील वाहतूक व्यवस्था बिघडू नये आणि वाहतूककोंडीची (Traffic) डोकेदुखी वाढू नये, यासाठी काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. काही रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, राजवाडे चौक जंक्शन, दिलीप गुप्ते मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग, गडकरी चौक, दादासाहेब रेगे मार्ग, शिवाजी पार्कजवळील बालगोविंददास मार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत.
बीकेसीबद्दल सांगायचे तर, वेस्टर्न एक्स्प्रेस वे, धारावी, वरळी सी लिंकवरून बीकेसी, कुर्ल्याकडे फॅमिली कोर्ट जंक्शनकडे जाण्यास बंदी असेल. त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर मार्गे आयकर जंक्शनच्या पलीकडे, सुर्वे जंक्शन आणि रज्जाक जंक्शनवरून एमटीएमएल जंक्शनमार्गे, चुनाभट्टी कनेक्टर पुलाच्या बाजूने ईस्टर्न एक्स्प्रेस वेकडे जाणारा रस्ता बीकेसीकडे जाण्यासाठी बंद राहील. हेही वाचा Happy Dussehra Wishes: विजयादशमीच्या मुहूर्तावर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह विविध नेते मंडळींकडून दसऱ्याच्या अनोख्या शुभेच्छा
कौटुंबिक न्यायालयाच्या मागे, बीकेसीजवळ, कॅनरा बँकेजवळील पे आणि पार्क, पंजाब नॅशनल बँकेसमोरील मैदान, फाटका मैदान, एमएमआरडीए कार्यालयासमोर आणि मागे, जिओ गार्डनजवळील पे आणि पार्क, जिओ गार्डनचे तळघर, वुई वर्क शेजरील मैदान, ओएनजीसी ग्राउंडजवळ, सोमय्या कॉलेज, एमसीए क्लब पार्किंग, सीबीआय इमारतीजवळील मैदान, अंबानी कॉम्प्लेक्सजवळील मैदान, मुक्त विद्यापीठाचे मैदान, ट्रेड सेंटरसमोरील मोकळी जागा, डायमंड बोर्स, जे.जे. एसडब्ल्यूसमोरील मोकळे मैदान, या सर्व ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
दादर येथील शिवाजी पार्कजवळ दसरा मेळाव्यासाठी पश्चिम आणि उत्तर उपनगरी भागातून बसमधून येणाऱ्या शिवसैनिकांसाठी दादर पश्चिम आणि कामगार मैदान परळजवळ सेनापती बापट मार्गाजवळ पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. इंडिया बुल्स फायनान्स सेंटर, इंडिया बुल्स फायनान्स सेंटर-1, कोहिनूर स्क्वेअरजवळ कार पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच इतर जिल्ह्यातून येणाऱ्या शिवसैनिकांच्या बसेस माटुंगा, नाथलाल पारेख मार्ग, इडनवाला रोड, आरएके रोड या पाच उद्यानांजवळ पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या संपूर्ण व्यवस्थेची माहिती मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने दिली आहे.