Maharashtra Weather Forecast: राज्यात कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यता तर विदर्भात उष्णतेची लाट कायम
हवामान खात्याच्या अंदाजानुसार आता पुढील 3-4 दिवसांमध्ये महाराष्ट्रात काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची बरसात होणार आहे.
भारतामध्ये यंदा उन्हाच्या तीव्रतेने अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. पण लवकरच या उन्हाच्या काहिलीतून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता आहे. अपेक्षेप्रमाणे यंदा भारतामध्ये मान्सूनचं आगमन वेळेआधीच झाले आहे. महाराष्ट्राकडे कूच केलेल्या पावसाचे आता येथे नागरिकांना, शेतकर्यांना वेध लागले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आता पुढील 3-4 दिवसांमध्ये महाराष्ट्रात काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची बरसात होणार आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 21 मे पर्यंत आता दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. नक्की वाचा: Monsoon Rain 2022: कोकण किनारपट्टीवर समुद्राच्या लाटांवर फेणी, मान्सूनची चाहूल; महाराष्ट्रात पर्जन्यवृष्टीचा इशारा .
यंदा 19 मे दिवशी मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, पराभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये विजांच्या कडकडाटासह पासून बरसण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस बरसण्याची शक्यता असली तरीही विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. 21 मे ला नागपूर, वर्धा, अकोला, यवतमाळ या भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सून तळकोकणात 2 जून पर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि कोकणच्या समुद्रकिनारपट्टीवर सध्या फेसाळत्या लाटा उसळत आहेत. त्या फेसांचे लोट किनाऱ्यावर धडकू लागले आहेत. ही परिस्थिती म्हणजे मान्सूनची चाहूल असते. यंदा राज्यात 6 जून पर्यंत मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा भारतामध्ये पाऊस सामान्य राहणार असल्याचा अंदाज IMD ने व्यक्त केला आहे.