Maharashtra Weather Forecast: संभाव्य Cyclone Tauktae च्या पार्श्वभूमीवर कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

महाराष्ट्रात चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना रविवारी आणि सोमवारी तसेच पुणे जिल्ह्याला सोमवारसाठी 'ऑरेंज अलर्ट' हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Rain in Maharashtra | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

भारतीय हवामान खात्याने (IMD)  16 मे च्या सुमारास देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाचा धोका वर्तवल्यानंतर आता समुद्र किनारी यंत्रणा अलर्ट मोड वर काम करत आहे. या चक्रीवादळाचा अद्याप महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला (Konkan Cost) धोका नसला तरीही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसू शकतो असा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर तटरक्षक दलाकडून रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदूर्ग (Sindhudurga) किनार्‍यावर मच्छिमार्‍यांना किनार्‍यावर परतण्याचा इशारा दिला आहे.

अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने15 मे पर्यंत त्याचे चक्रीवादळामध्ये रूपांतर होऊन 18 मेच्या संध्याकाळपर्यंत त्याचा गुजरात किनारपट्टीवर लॅन्डफॉल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रासाठी इशाऱ्याची तीव्रता वाढली आहे. 16 आणि 17 मे रोजी राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईमध्येही सोमवार (17 मे) दिवशी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रात चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना रविवारी आणि सोमवारी तसेच पुणे जिल्ह्याला सोमवारसाठी 'ऑरेंज अलर्ट' हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आज (14 मे) देखील वीजांच्या कडकडाटासह पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पहा 14-18 मे दरम्यान कशी असेल स्थिती? 

14 मे: गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कर्नाटकच्या सागरी भागात काही ठिकाणी वीजा आणि वादळी वाऱ्यासह (40-50 किमी प्रतितास) मुसळधार पावसाची शक्यता आहे.

15 मे: गोवा, कोकणातील काही ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह (30-40 किमी प्रतितास) मुसळधार पावसाची शक्यता.

गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्रातील (घाटमाथा) काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

16 मे: गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र (घाटमाथा), मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह (30-40 किमी प्रतितास) मुसळधार पावसाची शक्यता.

गोवा आणि दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर 50-60 किमी प्रतितास ते 70 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता.

17 मे:  गोवा, कोकणातील काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र (घाटमाथा) काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.

18 मे:  गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र (घाटमाथा) आणि कर्नाटक किनारपट्टीवरील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर 40-50 प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असणण्याची शक्यता.

कोकणाच्या तुलनेत विदर्भातील पावसाचा जोर मात्र रविवार (16 मे) पासून थोडा वाढू शकतो. अकोला, अमरावती, बुलडाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.