Maharashtra Unlock: राज्यात 5 टप्प्यांमध्ये होणार अनलॉक; जाणून घ्या काय आहेत 'हे' टप्पे

हे 5 टप्पे जिल्ह्याचा पॉझिटीव्ही रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता यावरुन ठरवण्यात आले आहेत.

Unlock | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

राज्यातील कोविड-19 निर्बंध (Covid-19 Restrictions) 5 टप्प्यांत शिथील होणार असल्याची घोषणा आज मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली.  हे 5 टप्पे जिल्ह्याचा पॉझिटीव्ही रेट (Positivity Rate) आणि ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी (Occupancy of Oxygen Beds) यावरुन ठरवण्यात आले आहेत. यातील सर्वात कमी पॉझिटीव्ही रेट असलेल्या जिल्ह्यांमध्ये कोणतेही निर्बंध नसतील, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात एकूण 18 जिल्हे येत असून उद्यापासून त्यांच्या अनलॉकिंग प्रक्रीयेला सुरुवात होईल. दरम्यान जाणून घेऊया काय आहेत हे 5 टप्पे आणि कोणत्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांमधील निर्बंध होणार शिथील....

पहा कोणत्या टप्प्यात कोणते जिल्हे?

पहिला टप्पा: या टप्प्यांत 5 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि 25 टक्क्यांहून कमी ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा 18 जिल्ह्यांचा समावेश केला असून उद्यापासून त्या जिल्ह्यांमध्ये अनलॉकिंग प्रक्रीया सुरु होणार आहे. यात ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.

दुसरा टप्पा: 5 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि 25 ते 40 टक्क्यांदरम्यान ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल ते जिल्हे दुसऱ्या टप्प्यात मोडत आहेत. यात एकूण 6 जिल्हे असून ते पुढीलप्रमाणे- अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदूरबार.

तिसरा टप्पा: तिसऱ्या टप्प्यात अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर हे 10 जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमध्ये 5 ते 10 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि 40 टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी आहे.

चौथा टप्पा:  10 ते 20 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि 60 टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असलेल्या चौथ्या टप्प्यात चार जिल्ह्यांचा समावेश होत आहे. यात पुणे, रायगड जिल्ह्यांचा समावेश आहे.

पाचवा टप्पा: 20  टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आणि 75 टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असणारे जिल्हे रेड झोनमध्ये असतील.

ANI Tweet:

(हे ही वाचा: काय सांगता! 'कोरोनामुक्त' असलेल्या गावाला मिळणार मालामाल होण्याची संधी, जाणून घ्या स्पर्धेची पूर्ण माहिती)

दरम्यान, मुंबई लोकल ट्रेन्सबद्दलही वडेट्टीवार यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. मुंबई अद्याप दुसऱ्या टप्प्यात असून  जेव्हा मुंबई पहिल्या टप्प्यात पोहचेल तेव्हा लोकल ट्रेन्स सुरु होतील, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.