Maharashtra Rain Update: आज राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता, काही जिल्ह्यांना येलो अलर्ट

पूर्व विदर्भ आणि तळ कोकणात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

Rain | representative pic- (photo credit -pixabay)

राज्यात यंदा पावसाचे आगमन उशीरा झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. यातच अद्यापही चांगला पाऊस न झाल्याने तलावांमधील पाणीसाठा देखील कमी उपलब्ध आहे. यामुळे मुंबईसह  अनेक शहरात पाणीकपात ही लागू करण्यात आली आहे. यामुळे आता सामान्य नागरिकांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वच जण जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे. अशामध्ये आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस (Heavy Rainfall) पडण्याची शक्यता हवामान खात्याने (Weather Department) वर्तवली आहे. (हेही वाचा - Jalna Water Issue: जालना जिल्ह्यातील प्रकल्पात 10 टक्के पाणीसाठा शिल्लक; ग्रामीण भागात पाणी टंचाईचं संकट)

आज कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भ आणि तळ कोकणात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार वारे, ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तर हवामान खात्याने काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देखील जारी केला आहे.  आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नंदूरबार, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पाहा ट्विट

आज हवामान खात्याकडून सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, वर्धा, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.