Maharashtra Politics: आज जी महाविकास आघाडी झाली ती 2009 मध्येच झाली असती पण.... शिवाजीराव आढळराव पाटलांचा गौप्यस्फोट
आज जी महाविकास आघाडी झाली ती 2009 मध्येच झाली असती, असं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितलं.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी आज शिरूरमध्ये (Shiroor) शिवसैनिकांची बैठक बोलावली होती. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. गेली अडीच वर्षे आपल्यावर अन्याय झाल्याने मी हा मोठा निर्णय घेतला आहे असं कारण पुढे करत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिंदे गटाला समर्थ दर्शवलं आहे. तसेच शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) असतील पण राज्याचं सरकार मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) चालवतील, असं आढळराव यांनी या बैठकीत स्पष्ट केलं.
दरम्यान शिवाजीराव आढळराव पाटील यांनी 2009 मधील एक किस्सा सांगितला. लोकसभा निवडणुकीच्या आधी संजय राऊत यांनी मला सांगितले की, शरद पवार शिरूर लोकसभा (Shiroor Loksabha Constituency) लढवणार आहेत म्हणून तुम्ही मावळ लोकसभा (Maval Loksabha) लढवा. त्यामुळं उद्धव ठाकरेंची सभा तूर्तास आपण घेणार नाही. आपण राष्ट्रवादी (NCP) बरोबर जाणार आहोत. पण दोन दिवसांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची सभा आहे, ती रद्द करायला सांगा असे मी संजय राऊत (Sanjay Raut) यांना म्हणालो. त्यावर राऊत म्हणालेत आता आपण पवारांना कसं काय सांगणार? या सगळ्या प्रकाराची माहिती मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना दिली. त्यानंतर शरद पवार यांनी युतीचा प्रस्ताव फेटाळला. अन्यथा आज जी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) झाली ती 2009 मध्येच झाली असती, असं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितलं. तसेच त्यावेळी मला शरद पवारांनी देखील दोन वेळा राज्यसभेवर (Rajsabha) घेण्याची ऑफर (Offer) दिली होती असा गौप्यस्फोट आढळरावांनी केला आहे. (हे ही वाचा;-Ramdas Kadam: कुणाला मंत्री बनवलं म्हणजे भीक दिली असं समजू नका, रामदास कदम यांचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल)
शिवाजीराव आढळराव म्हणाले "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला. पण दुर्दैवानं ज्यांच्या विरुद्ध लढलो त्यांच्यासोबत आम्हाला सरकार स्थापन करावं लागलं. तरी आम्ही काही बोललो नाही. पण मुख्यमंत्री आमचे आणि गुन्हे कोणावर दाखल झाले तर शिवसैनिकांवर. उद्धव ठाकरे साहेबांना मी याची कल्पना द्यायचो. एकदाच फक्त अधिकारी माझ्यापर्यंत आले, मात्र त्यानंतर काही प्रतिसादच मिळाला नाही.", अशी खंत शिवाजीराव आढळराव यांनी व्यक्त केली.