Maharashtra Assembly Session: पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन विरोधक आक्रमक, विधीमंडळाच्या पायऱ्यावर घोषणाबाजी

विधीमंडळाच्या पायऱ्यावर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Photo Credit -X

Maharashtra Assembly Session: पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून महायुती सरकारचं हे शेवटचे अधिवेशन असल्याने हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धकरण्याचा प्रयत्न केला. विधीमंडळाच्या पायऱ्यावर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समोर दिसताच विरोधकांनी हातवारे करत सरकारच्या कामकाजाचा निषेध केला.

'शेतकरी उपाशी महायुती सरकार तुपाशी, कमिशनखोर सरकार हाय हाय, 'शेतकरी विरोधी महायुती सरकारचा धिक्कार असो 'अशा घोषणा देत विरोधकांनी विधीमंडळाचा परिसर दणाणून सोडला. मुंबई येथे पावसाळी अधिवेशन होत आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, पाहिजे यासाठी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

व्हिडीओ पहा-

शेतकऱ्यांचे विविध प्रश्न विरोधकांनी मांडले. शेतकऱ्याचे वीज बिल माफ झाले पाहिजे, कर्जमाफी झाली पाहिजे अशा घोषणा करण्यात आल्या. कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात बळीराजाचा बळी, कोरडा डोळा कोरडी विहीर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कोण देणार धीर, शेतकरी विरोधी महायुती सरकारचा धिक्कार असो, शेतकरी उपाशी महायुती सरकार तुपाशी, अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ झालेच पाहिजे,अशी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.