Maharashtra MLC Election 2020: पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी कुणाला? पाहा कोणाच्या नावाची चर्चा?

गेली दहा वर्षे या मतदार संघातून भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे प्रतीनिधित्व करत होते. मात्र, सध्या ते कोथरुड विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले आहेत. त्यामुळे विधानपरिषदेतील त्यांची जागा ऑक्टोबर 2019 पासून रिक्त आहे.

Maharashtra Legislature | (Archived images)

पुणे पदवीधर मतदारसंघातून (Pune Graduate Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) कोणाला उमेदवारी देणार याबाबत उत्सुकता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार, साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांच्या नावाची जोरादार चर्चा होती. मात्र अनुक्रमे पार्थ पवार आणि सारंग पाटील या दोघांनीही आपण पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, मागच्या निवडणुकीतील राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार अरुण लाड (Arun Lad) यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. अद्याप तरी सर्वच काही गुलदस्त्यात आहे. अनेकांच्या नावांच्या चर्चा मात्र सुरु आहेत.

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अशा पाच जिल्ह्यांचा मिळून हा मतदारसंघ बनला आहे. गेली दहा वर्षे या मतदार संघातून भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे प्रतीनिधित्व करत होते. मात्र, सध्या ते कोथरुड विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले आहेत. त्यामुळे विधानपरिषदेतील त्यांची जागा ऑक्टोबर 2019 पासून रिक्त आहे.

चंद्रकांत पाटील यांनी या मतदारसंघातून प्रतिनिधीत्व केले असले तरी, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद आहे. या आधीच्या दोन्ही निवडणुकांमध्ये मतविभागणिचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडखोरीचा फायदा चंद्रकांत पाटील यांना झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या वेळी राष्ट्रवादी कोणाला मैदानात उतरवते याबाबत उत्सुकता कायम आहे. मागच्या वेळी भाजपचे चंद्रकांत पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे सारंग पाटील अशी लढत झाली. मात्र, राष्ट्रवादीच्या अरुण लाढ यांनी बंडखोरी केली. त्यामुळे मतविभाजन झाले आणि सारंग पाटील यांचा पराभव झाला. (हेही वाचा, Maharashtra MLC Election 2020: विधान परिषदेच्या आणखी 5 जागा पुढच्या आठवड्यात रिक्त; 17 जागा कधी भरणार याबाबत उत्सुकता)

दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी युवा कँग्रेस अथवा राष्ट्रवादी महिला आघाडी अध्यक्षाला आमदार करण्याचा शिरस्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काही वर्षे पाळला आहे. त्यानुसार राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलेले जितेंद्र आव्हाड, रणजितसिंह मोहिते-पाटील, निरंजन डावखरे यांना पक्षाने विधानपरिषदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे या वेळी आजी, माजी युवा अध्यक्षांच्या नावाची चर्चा आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य व जिल्हा राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांच्या नावाचीही चर्चा सुरु आहे.