महाराष्ट्रात संचारबंदी लागू करुन सैन्य तैनात करण्यात येणार असल्याची अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार- गृहमंत्री अनिल देशमुख

शा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशा इशाराही गृहमंत्र्यांनी दिला आहे.

Home Minister Anil Deshmukh | (Photo Credits: Facebook Live Screenshot)

कोरोना महामारी ही भारत आणि महाराष्ट्रासमोरील मोठी सार्वजनिक आरोग्य आपदा आहे. अशा परिस्थितीत मुंबईसह महाराष्ट्रातील इतर शहरांवर संपूर्ण संचार बंदी लागू करण्यासाठी सैन्य तैनात होणार आहे, अशी अफवा पसरली जात आहे. या कालावधीत लोकांना भाजीपाला, किराणा आणि दूध यासारख्या गोष्टी जास्तीत जास्त जमा ठेवण्यास सांगितलं गेलं आहे. अशा प्रकारचा संदेश सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून पसरवला जात आहे. त्यामुळे लोकांनाचा गोंधळ उडाला आहे. दरम्यान ही बातमी बनावट असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी स्पष्ट केले आहे. तसंच अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशा इशाराही गृहमंत्र्यांनी दिला आहे.

“नागरिकांनी अशा संदेशांवर विश्वास ठेवू नये तसंच असे मेसेजेस फॉरवर्ड करू नये. कारण यामुळे समाजात उगाचच घबराट पसरते. महाराष्ट्र सरकार कोविड-19 विरुद्ध लढाईस वचनबद्ध आहे आणि या लढ्यातील धोरणात्मक निर्णयाबाबत नागरिकांना वेळोवेळी राज्य सरकार विश्वासात घेत आलं आहे,” असेही ते म्हणाले. तसंच अशा प्रकारच्या अफवा पसरवल्यास आयटी कायदा आणि आयपीसी या दोन्ही तरतुदी प्रमाणे दंड आणि शिक्षा होऊ शकते, अशी ताकीदही गृहमंत्र्यांनी दिली आहे. (कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई, पुण्यात लष्कर बोलवणार? जाणून घ्या यामागील व्हायरल सत्य)

महाराष्ट्र सायबर विभाग या मुद्दयाकडे बारकाईने पहात आहे आणि यापूर्वीच त्यांनी अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्र सायबर विभागाच्या चौकशीत असे आढळले आहे की, विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील 12 मुख्य यूझर आयडी (User ID) मे 8, 2020 पासून आजपर्यंत या अफवा / बनावट बातम्या पसरवत आहेत. अशा हँडल विरुद्ध सीआरपीसी सेक्शन 149 अंतर्गत कायदेशीर चेतावणी देण्याच्या स्वरूपात महा सायबरने यापूर्वीच नोटिसा पाठवल्या आहेत. एफबी, ट्विटर यांसारख्या प्लॅटफॉर्मवर देखील ही पोस्ट काढून घ्या आणि जे ओळखले गेले आहे अशा लोकांची खाती स्थगित करण्यास सांगण्यात आले आहे, असेही देशमुख यांनी सांगितले आहे. तसंच महाराष्ट्र पोलीस कोणत्याही उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्यास सक्षम आहेत, असा विश्वासही गृहमंत्र्यांनी व्यक्त केला.