शासकीय कर्मचारी आणि कुटुंबियांना कोविड-19 वरील उपचाराचा खर्च परत मिळणार; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
कोरोनावरील उपचार खाजगी रुग्णालयात घेतलेल्या सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना खर्चाची परतफेड करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोरोनावरील उपचार खाजगी रुग्णालयात घेतलेल्या सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना खर्चाची परतफेड करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 2 सप्टेंबर 2020 पासून हा आदेश लागू होईल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी म्हटले आहे. यासंदर्भातील माहिती आरोग्यमंत्र्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. सरकारी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय यांना कोविड-19 आजाराचा खाजगी रुग्णालयात झालेला खर्च देण्यात येणार असल्याचे टोपे यांनी म्हटले आहे.
राजेश टोपे यांनी ट्विटमध्ये लिहिले, "शासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांनी आकस्मित तसेच गंभीर आजारावर खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यास त्यांच्यावर होणाऱ्या खर्चाची प्रतिपूर्ती देण्यात येते.सदर वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोविड-19 या आजाराचा अंतर्भाव करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यशासनाने घेतला आहे."
राजेश टोपे ट्विट:
ANI Tweet:
गेल्या 9 महिन्यांपासून कोरोना व्हायरसचे संकट सुरु आहे. कोविड-19 चा संसर्ग आटोक्यात आला असला तरी धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे. दरम्यान, लसीकरणाचा आराखडा तयार असून जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होऊ शकते असा अंदाज देखील राजेश टोपे यांनी वर्तवला आहे. (COVID19 Vaccine: केंद्र सरकारने सीरम, भारत बायोटेक यांना कोरोनावरील लसीसाठी परवानगी दिल्यास जानेवारी पासून लसीकरण सुरु होऊ शकते- राजेश टोपे)
लेटेस्ट अपडेटनुसार, आज राज्यात 3,880 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून 4,358 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 17,74,255 वर पोहचली असून सध्या 60,905 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील कोविड-19 चा रिकव्हरी रेट 94.14% वर पोहचला आहे.