घरपोच दारु सेवा वक्तव्यावरुन बावनकुळेंचा 'यू टर्न' म्हणाले 'अशी कोणतीच योजना नाही'

दारु घरपोच ही योजना लागू करण्याबाबततचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती मंत्री बावनकुळे यांनी दिली होती. मात्र, त्यांच्या या विधानानंतर राज्यभरातून चौफेर टीका झाली.

घरपोच दारु सेवा वक्तव्यावरुन बावनकुळेंचा 'यू टर्न' म्हणाले 'अशी कोणतीच योजना नाही'
(संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

घरपोच दारु सेवा देणाऱ्या 'गेम चेंजर' योजनेच्या प्रस्तावित विचारावरुन उत्पादनशुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अवघ्या २४ तासात थेट 'यू-टर्न' घेतला आहे. दारु घरपोच ही योजना लागू करण्याबाबततचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती मंत्री बावनकुळे यांनी दिली होती. मात्र, त्यांच्या या विधानानंतर राज्यभरातून चौफेर टीका झाली. त्यानंतर बावनकुळे यांनी नागपुरात सांगितले की, राज्य सरकाशी कोणतीच योजना नाही.

मंत्री बावनकुळे म्हणाले, 'घरपोच दारुसेवेस मान्यता देण्याबाबत कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत काही दुकानदारांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून दारु ऑर्डर बुकींग करण्यास सुरुवात केली होती. तसेच, हे विक्रेते दारुची सेवा घरपोच देत होते. ही सरकारची योजना नव्हती. घरपोच दारुसेवा देण्यासाठी मान्यता द्यावी अशी मागणी करणारे निवेदन सरकारकडे आले आहे. मात्र, या मागणीस मान्यता देण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही.'

काय म्हणाले होते बावनकुळे?

घरपोच दारु सेवा देण्याबाबत मंत्री बावनकुळे म्हणाले होते, मद्य उद्योगासाठी ही योजना 'गेम चेंजर' ठरेल. दारु पिऊन गाडी चालवल्यामुळे किंवा दारु पिऊन रस्त्यावर चालल्यामुळे झालेल्या अपघातांची संख्या सर्वाधिक आहे. हे अपघात टाळण्यासाठी व सुरक्षित रस्ते प्रवासासाठी उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. ज्या पद्धतीने इ-कॉमर्स वेबसाइट इतर वस्तू घरपोच करतात. या पार्श्वभूमीवर घरपोच दारु सेवा उपलब्ध करुन दिल्यास ‘ड्रिंक अँड ड्राइव्ह’सारख्या घटनांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले होते. (हेही वाचा, ..तर, मंडळी आता दारुही मिळणार घरपोच; राज्य सरकार सकारात्मक)

दरम्यान, सरकारच्या विचाराधीन असलेल्या योजनेच्या प्रस्तावाबाबत बोलताना बावनकुळेंनी सांगितले होते की, घरोपच डिलिव्हरीसाठी दारुची ऑर्डर घेताना विक्रेत्याला ग्राहकाची संपूर्ण माहिती घ्यावी लागेल. यात ग्राहकाच्या आधार नंबर घेणे सक्तीचे असेल. आधार नंबर घेतल्यामुळे ग्राहकाची ओळख पटण्यास मदत होईल. तसेच, ग्राहाला वितरीत करण्यात येणाऱ्या बॉटलवर जियो टॅगिंग असेन. त्यामुळे त्याचे ट्रॅकींग ठेवता येईल. याचाच सरळ अर्थ असा की, उत्पादकापासून ते ग्राहकाच्या घरापर्यंत त्या बॉटलचा प्रवास समजू शकेल. या सेवेमुळे दारुची तस्करी आणि चुकीच्या दारुविक्रीवर पायबंद लावता येऊ शकेल असा विश्वासही बावनकुळे यांनी बोलून दाखवला होता. मात्र, राज्यभरातून झालेला विरोध पाहता बावनकुळे यांनी आपल्याच विधानावरुन यू-र्टन घेतला.

(The above story first appeared on LatestLY on Oct 15, 2018 09:33 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).