Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यभरात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, गडचिरोलीमध्ये सर्वाधिक मतदान

तर महाराष्ट्रात दुपारी एक वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान झाले आहे.

Photo Credit- X

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: देशभरात दोन राज्यांच्या निवडणुका आणि पोटनिवडणुकांचे आज मतदान होत (Maharashtra Assembly Elections 2024) आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरु झाले आहे. मतदानाच्या टक्केवारीत झारखंड महाराष्ट्राच्या पुढे गेला आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत झारखंडमध्ये 47.72 टक्के मतदान झाले. तर महाराष्ट्रात दुपारी एक वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान झाले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात झाले असून 50 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

राज्यात एकूण 4 हजार 136 उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. यासाठी आता मतदारराजा आपल्या पसंतीच्या उमेदवाराला विधानसभेत पाठविण्यासाठी सज्ज झाला आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा तयार आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांत राज्यात बदललेली राजकीय समीकरणं पाहता, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे.

महायुती, महाविकास आघाडी या दोन युत्या-आघाड्यांसह अनेक पक्ष रिंगणात आहेत. त्यांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होत आहे. दरम्यान, दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान झाले आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत 18.14% मतदान झाले होते. मुंबई शहर जिल्ह्यात 15.78%, तर मुंबई उपनगर जिल्ह्यात 17.99% मतदान झाले. मुंबईतील कुलाबा विधानसभा क्षेत्रात 13.03%, माहीममध्ये 19.66% आणि वरळीमध्ये 14.59% मतदान झाले. उपनगरातील भांडुपमध्ये 23.42% इतके जास्त मतदान झाले. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात 18.22 टक्के मतदान झाले.

गोंदिया जिल्ह्यात 40 टक्के, कोल्हापूर जिल्ह्यात 38.56 टक्के असे मतदान झाले आहे. पुणे जिल्ह्यात 29.03 टक्के मतदान झाले आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणि बारामतीत अनुक्रमे 35.63 आणि 33.78 टक्के मतदान झाले आहे. पुणे जिल्ह्यातील पर्वती मतदारसंघात 27,19, पिंपरीत 21,34, शिवाजीनगर 23.46, वडगाव शेरी 26.38 टक्के मतदान झाले आहे. पुणेकरांसमोर मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

बीडमध्ये 32.58 टक्के, भंडारामध्ये 35.08 टक्के, बुलढाणात 32.11 टक्के, चंद्रपूरमध्ये 35.54 टक्के,धुळेमध्ये 34.05 टक्के, गडचिरोलीमध्ये 50.89 टक्के, गोंदियामध्ये 40.46 टक्के, हिंगोलीमध्ये 35.97 टक्के मतदान झाले.