COVID-19 Restrictions in Maharashtra: कोविड-19 निर्बंधांच्या कालवधीमध्ये 15 दिवसांची वाढ? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे संकेत
या कालावधीत आता 15 दिवसांनी वाढ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातील कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 1 मे पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या कालावधीत आता 15 दिवसांनी वाढ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली. लॉकडाऊन (Lockdown) आणि कोरोना लसीकरणाबाबत (Vaccination) आज राज्य मंत्रीमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत लॉकडाऊन वाढीबाबत सर्व मंत्र्यांचे एकमत असल्याचे टोपे यांनी सांगितले. (Corona Vaccination In Maharashtra: 18 वर्षांवरील सर्वांचे मोफत कोरोना लसीकरण, महाविकासआघाडी सरकारचा निर्णय)
राजेश टोपे म्हणाले, "राज्यामध्ये 60 हजारहून अधिक रुग्ण आढळत आहेत. सध्या लागू केलेल्या निर्बंधांमुळे ही आकडेवारी काही प्रमाणात आटोक्यात आल्याचे दिसून येत आहे. दिवसागणित आढळणाऱ्या रुग्णांची संख्या 70 हजारांच्या पार जाईल, अशी आम्हाला भीती होती. परंतु, सुदैवाने तसे झाले नाही. कोरोनाची सध्याची आकडेवारी ही उच्चांकी असायला हवी यापुढे रुग्णवाढीचा ग्राफ कमी व्हायला हवा, अशी आपण प्रार्थना करु."
लोकांनी मास्क घालणे, सोशल डिस्टसिंग पाळणे यांसारख्या नियमांचे पालन केल्यास आपण कोविड-19 ची गंभीर स्थिती लवकरच आटोक्यात आणू शकतो. परंतु, त्यासाठी हे कडक निर्बंध अजून 15 दिवस वाढवण्याची गरज आहे. यावर सर्व कॅबिनेट मंत्र्यांचे सहमत आहे, असेही ते म्हणाले.
ANI Tweet:
दरम्यान, 5 पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यावर निर्बंध आहेत. यासोबतच केवळ अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींनाच प्रवासाची मुभा आहे. भाजी, किराणा दुकाने आणि दूध डेअरी सकाळी 7-11 या वेळेत सुरु राहतील. यासोबतच फुड डिलिव्हरीसाठी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. खाजगी कार्यालये आणि लग्नासंबंधिचे नियम पूर्वीप्रमाणेच राहतील, हे देखील आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.