Maharashtra Corona Update: महाराष्ट्रासाठी दिलासा! कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 90.69 टक्क्यांवर, डिस्चार्जची संख्याही वाढली

राज्यातील कोरोना संक्रमितांच्या आकडेवारीसोबत कोरोना रुग्णांच्या या संख्येची रिकव्हरी रेटमध्ये तुलना करता तो आकडा 90.69% इतका जातो आहे.

Coronavirus in Maharashtra | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्यात कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाची दुसरी लाट कायम आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जाते आहे. अशात महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक वृत्त (Maharashtra Corona Update) आहे. राज्यातील कोरोना रुग्णांना डिस्चार्ज मिळण्याचे प्रमाण वाढते आहे. त्यासोबतच राज्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेटही सुमारे 90.69% इतक्या वर पोहोचला आहे. कोरोना व्हायरस संसर्ग नियंत्रणासाठी राज्य सरकारने कडक निर्बंधांसह लॉकडाऊन (Lockdown) लागू केला आहे. त्याचा दृश्य परिणाम आता दिसू लागला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्याही हळूहळू खाली येताना दिसत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने मंगळवारी (18 मे 2021) दिलेल्या आकडेवारीनुसार दिवसभरात राज्यात 28,438 कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 52,898 रुग्ण बरे झाले. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात दिवसभरात 679 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना व्हायरस महामारीबाबत आकडेवारी जाहीर करताना आरोग्य विभागाने म्हटले आहे की, महाराष्ट्रात कोरोनावरील उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या 49,27,480 इतकी झाली आहे. राज्यातील कोरोना संक्रमितांच्या आकडेवारीसोबत कोरोना रुग्णांच्या या संख्येची रिकव्हरी रेटमध्ये तुलना करता तो आकडा 90.69% इतका जातो आहे. (हेही वाचा, Corona Second Wave in India: भारतात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत 300 पत्रकारांचा मृत्यू; इन्स्टिट्यूट ऑफ परसेप्शन स्टडीजमध्ये खुलासा)

दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढत असला तरी मृतांच्या संख्येकडे दुर्लक्ष करता येणार नाही. राज्यातील मृतांची संख्याही प्रचंड मोठी आहे. मंगळवारी (18 मे) दिवसभरात 679 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत कोरोना मृतांचाआकडा 83,777 इतका झाला आहे. त्यामुळे रिकव्हरी रेटच्या तुलनेत मृत्यूदर 1.54% इतका राहिला आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांच्या पॉझिटीव्हीटी दराबाबत बोलायचे तर हा आकडा 17.02% इतका आहे. राज्यात मंगळवारी 28,438 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला. राज्यात आतापर्यंत एकूण 54,33,506 नागरिकांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला. त्यापैकी 49,27,480 जण उपचार घेऊन बरे झाले. सध्यास्थितीतर राज्यात सक्रीय रुग्णांची संख्या 4, 19,727 इतकी आहे