Maharashtra: आजपासून राज्यात सिनेमागृहं, थिएटर्स खुली; कोविड-19 चा संसर्ग टाळण्यासाठी कशी घ्याल काळजी?
आज पासून सिनेमा हॉल, थिएटर्स, मल्टिप्लेक्स सुरु करण्यास महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली आहे
कोरोना व्हायरस (Coronavirus) लॉकडाऊनचे (Lockdown) नियम अनलॉकिंगच्या माध्यमातून हळूहळू शिथिल होऊ लागले आहेत. आजपासून (5 नोव्हेंबर) सिनेमा हॉल (Cinema Hall), नाट्यगृहं (Drama Theaters), थिएटर्स (Theaters), मल्टिप्लेक्स (Multiplex) सुरु करण्यास महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली आहे. मात्र कन्टेंनमेंट झोन बाहेरील सिनेमागृह खुली करण्यात येणार असून केवळ 50% क्षमतेवर ती सुरु राहणार आहेत. त्याचबरोबर योग संस्था, इनडोअर गेम्संना देखील मुभा देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी काही नियम लागू करण्यात आले असून कोविड-19 संसर्ग टाळण्यासाठी त्याचे पालन करणे आवश्यक आहे. तसंच नागरिकांनी देखील विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
# सिनेमागृहं, नाट्यगृहं 50% क्षमतेवर सुरु राहतील.
# थिएटर्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी नाही.
# फिजिकल डिस्टसिंगचे पालन करणे आवश्यक.
# थिएटर्स आणि परिसरात सॅनिटायझेशन होणे आवश्यक आहे.
# मास्कचा वापर अनिवार्य.
# वेळोवेळी हात सॅनिटायझरने स्वच्छ करणे गरजेचे आहे.
त्याचबरोबर राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळांडूसाठी कन्टेंनमेंट झोन बाहेरील स्विमिंग पूल्स आजपासून सुरु करण्यात आली आहे, त्याचबरोबर योग संस्था, बँडमिंटन, टेनिस, स्क्वॉश, शूटिंग यांसारख्या इनडोअर गेम्संना देखील परवानागी देण्यात आली आहे.
कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून या सेवा-सुविधा बंद होत्या. त्यामुळे एकंदर व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मनोरंजन विश्वासह अनेकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मुंबई लोकलही सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तसंच राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक, मनोरंजनात्मक कार्यक्रम यावरील बंदीही कायम आहे. दरम्यान, नोव्हेंबर अखेरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र सुरु करण्याचा सरकारचा मानस असल्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 16,98,198 वर पोहचला आहे. त्यापैकी 15,40,005 रुग्ण बरे झाले असून 44,548 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या 1,12,912 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, लॉकडाऊन 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे.