बीड च्या भाजप आमदार नमिता मुंदडा यांचे कर्तव्यदर्शन! 8 महिन्याच्या गरोदर असतानाही महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात हजेरी
आमदार नमिता मुंदडा या आठ महिन्याच्या गर्भवती असूनही सभागृहात येऊन कामकाजात सक्रिय सहभाग घेत आहेत खास म्हणजे पहिल्याच महिला आमदार आहेत ज्या गरोदर असताना कामकाजात सहभागी होत आहेत.
Maharashtra Budget Session 2020: महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प अधिवेशन 24 फेब्रुवारीपासून सुरु होताच, आरक्षण, सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ते मराठी भाषा अनिवार्य करणे असे अनेक मुद्दे चर्चेचा विषय ठरले होते. सत्ताधारी आणि विरोधी पक्षात अनेक मुद्द्यांवरून नेहमीप्रमाणे भांडण आणि टोलेबाजी पाहायला मिळाली मात्र एका बाबतीत सर्वांचे एकमत झाले होते, विशेष म्हणजे ही बाब सुद्धा एका भाजप आमदाराच्या कौतुकाशी संबंधित होती. या आमदार म्हणजे बीड च्या नमिता मुंदडा (Namita Mundada). आमदार नमिता मुंदडा या आठ महिन्याच्या गर्भवती असूनही सभागृहात येऊन कामकाजात सक्रिय सहभाग घेत आहेत खास म्हणजे पहिल्याच महिला आमदार आहेत ज्या गरोदर असताना कामकाजात सहभागी होत आहेत. मुंदडा यांच्या प्रसूतीची तारीख आता अगदीच जवळ आहे मात्र त्या आधीचे हे अधिवेशन महत्वाचे असल्याने या अवस्थेत सुद्धा त्या कामात सहभाग घेत आहेत.
नमिता मुंदडा यांनी माध्यमांशी संवाद साधताना, "अधिवेशनात जास्त वेळ बसताना त्रास होतो. अशावेळी थोड्या थोड्या वेळाने बाहेर लॉबीमध्ये चालायला, पाणी प्यायला परवानगी दिले जाते, सभागृहात अनेक आमदार काळजी घेतात. अध्यक्षांनी सुद्धा उशी घेऊन बसण्याची सूट दिली आहे. तसेच सरकारच्या धोरणांच्या विरोधात आंदोलन करत असताना त्यामध्ये सहभागी होऊ देत नाहीत असे सांगितले. तसेच आता थोडा त्रास होत असला तरीही आपल्या बाळावर वेगळे आणि महत्वाचे गर्भसंस्कार होत आहेत याचा आनंद सुद्धा त्यांनी व्यक्त केला.
ANI ट्विट
दरम्यान, नमिता मुंदडा यांना विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी जाहीर झाली असताना ऐनवेळी त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता. केज मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून देखील आल्या. राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीमुळे भाजपत प्रवेश केला असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.