Maharashtra Budget 2020-21: उद्धव ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज होणार सादर; शेतकरी, नोकरदार व महिलांसाठी काय असणार तरतुदी?
विधीमंडळात सकाळी 11 वाजता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) अर्थसंकल्प सादर करतील. तर, अर्थराज्य मंत्री शभुराजे देसाई (Shambhuraje Desai) विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडतील.
शिवसेना (Shivsena) , राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) , आणि काँग्रेस (Congress) या तीन पक्षीय महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज, 6 मार्च रोजी सादर होणार आहे. विधीमंडळात सकाळी 11 वाजता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) अर्थसंकल्प सादर करतील. तर, अर्थराज्य मंत्री शभुराजे देसाई (Shambhuraje Desai) विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडतील.महाराष्ट्र निवडणुकीच्या नंतर तीन भिन्न विचारसरणीच्या पक्षांनी काही सर्वसाधारण मुद्द्यांवर एकमत करून महाविकास आघाडी स्थापन केली होती यामध्ये शेतकऱ्यांचे हित, नोकरदारांसाठी कर रचना आणि महिला सुरक्षेसाठी तरतुदी यांचा समावेश होता, आता सत्तेत आल्यावर ठाकरे सरुकार आपल्या अर्थसंकल्पातून या मुद्द्यांवर काम करणार का आणि बजेट मध्ये नेमक्या या व्यक्तींसाठी काय तरतुदी असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आले.
अलीकडेच उद्धव ठाकरे यांच्या सरकारतर्फे, महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना लागू करण्यात आली ज्या अंतर्गत 2 लाख पर्यंतच्या कर्जाला माफी देण्याचा मोठा निर्णय अंमलात आणला गेला. त्यांनतर,आता बजेट मधून शेतकऱ्यांसाठी अन्य काही योजना नव्याने मांडल्या जाणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे मागील काही काळात, महिला सुरक्षेसाठी घातक असे अनेक प्रसंग समोर आले आहेत, त्यावर भविष्यात रोख बसवण्यासाठी काही तरतुदी मांडल्या जाऊ शकतात.
दुसरीकडे, नोकरदार वर्गासाठी कररचनेत काय बदल केले जातात? उद्योजकांना कर्जासाठी काय सुविधा मिळणार? शैक्षणिक क्षेत्रातील शिष्यवृत्ती या सारखे मुद्दे यंदाच्या अर्थसंकल्प अधिवेशनात वेळोवेळो मांडण्यात आले होते, यावर उत्तर मिळणार का हे आता काहीच वेळात समजणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, अर्थसंकल्प सादर होण्याच्या आधी 10.30 वाजता उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बोलावली आहे, ज्यामधे या अर्थसंकल्पाला मंजुरी घेण्यात येणार असून त्यानंतर बजेट विधानसभा व विधानपरिषदेत सादर केले जाईल. जागतिक बाजारात एकूणच असणारी मंदी, आर्थिक पाहणी अहवालातील महाराष्ट्राचे घटलेले दरडोई उत्पन्न, केंद्रीय योजना या सर्व मुद्द्यांना धरून हा अर्थसंकप सादर करणे हे ठाकरे सरकासमोरील मोठे आव्हान असणार आहे.