Maharashtra Bandh Fact check: मराठा आरक्षण मुद्द्यावर महाराष्ट्र बंदची आफवा, सोशल मीडियावरील व्हायरल मेसेज चुकीचे
एक नव्हेत तर अशा आशयाचे असंख्य मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, या मेसेजची सत्यता तपासली असता त्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. स्वत: मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाने सोशल मीडियावरील संदेशांचे खंडण केले आहे.
मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनास आगोदरच हिंसक वळण लागले असताना सोशल मीडियावर आज महाराष्ट्र बंद (Maharashtra Bandh) पाळण्यात येत असल्याचे मेसेज फिरत आहेत. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना पाठिंबा देण्यासाठी ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या वतीने या बंदचे आयोजन करण्यात आल्याचा दावाही या मेसेजमध्ये करण्यात येतो आहे. एक नव्हेत तर अशा आशयाचे असंख्य मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, या मेसेजची सत्यता तपासली असता त्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. स्वत: मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाने सोशल मीडियावरील संदेशांचे खंडण केले आहे. आम्ही अशा प्रकारे कोणताही बंद पाळला नाही, तसेच तो जाहीरही केला नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाने सातारा जिल्हा बंदचा निर्णय घेतला आहे. केवळ सातारा जिल्ह्यातील बंद वगळता इतर कोठेही बंद पाळण्याचे अवाहन आम्ही केले नसल्याचे मराठा समाजाने म्हटले आहे. सातारा जिल्हा बंद हा मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आहे. दरम्यान, सर्व नागरिकांनी अत्यावश्यक सेवा, सुविधा वगळता नागरिकांनी बंद यशस्वी करावा असे, अवाहन मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी केले आहे.
|
मराठा आरक्षणाचा मुद्दा आता अधिक तापला आहे. आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी काल (30 ऑक्टोबर) आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर यांची घरे जाळली. तसेच, अनेक ठिकाणी तहसील कार्यालयातील सरकारी वाहने, जिल्हा परिषद कार्यालय जाळल्याचेही वृत्त आहे. आंदोलकांनी काही ठिकाणी सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान केले. यात एसटी बसेस अधिक फोडण्यात आल्या. काही ठिकाणी खासगी मालमत्तांनाही लक्ष्य करण्यात आले. या पार्श्वभूमीवर बीड शहरात संचारबंदी आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कर्नाटक बससेवा काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रामध्ये आलेल्या बसना आंदोलकांकडून लक्ष्य करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. दरम्यान, अनेक ठिकाणी अद्यापही आंदोलक आक्रमक असून काही ठिकाणी आंदोलकांनी रेल रोको करण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, कोणताही अनुचीत प्रकार टाळण्यासाठी राज्य सरकार सतर्क झाले असून पोलीस यंत्रणांना तशा सूचना गेल्या आहेत. त्यामुळे पोलीसांनीही आवश्यक तेथे बंदोबस्त वाढवला आहे. काही ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडविण्यासाठी कारण ठरल्याचा आरोप करत काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.