Maharashtra Bandh: लखीमपुर खेरी हिंसेविरुद्ध महाराष्ट्र बंदची हाक; संध्याकाळी 4 पर्यंत दुकाने राहणार बंद

महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीने हा बंद पुकारला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तसेच इतर लहान पक्षांनी बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.

Bharat Bandh (Photo Credits: PTI)

उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकरी आणि इतरांच्या मृत्यूच्या निषेधार्थ सोमवार, 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीने हा बंद पुकारला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तसेच इतर लहान पक्षांनी बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. या पार्श्वभुमीवर मुंबईसह राज्यातील इतर मोठ्या शहरांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकाणी व्यापाऱ्यांनीही बंदला पाठिंबा दिला असून दुपारी 4 पर्यंत दुकाने व आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दादरच्या प्रसिद्ध फूल मार्केटमध्ये सोमवारी सकाळी बंदचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. इथे नेहमीप्रमाणेच गर्दी दिसून आली.

उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले की, बंद रात्री 12 वाजल्यापासून सुरू झाला आहे. त्यांनी आरोप केला की, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पूर्वी कृषी कायद्यांद्वारे शेतमालाची लूट करण्यास परवानगी दिली आणि आता त्यांचे मंत्री, त्यांचे नातेवाईक शेतकऱ्यांना मारत आहेत.

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा या संपूर्ण प्रकरणात मुख्य आरोपी आहे. नुकतीच त्याला अटक करण्यात आली. आता अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी महाविकास आघाडीने केली आहे. काँग्रेसने सर्व राज्यांच्या राजभवनाबाहेर निदर्शने करण्याची योजना आखली आहे. सर्व राज्यांतील मोठे नेते मूक प्रदर्शनाद्वारे लखीमपूर हिंसाचारात मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबीयांना आपला पाठिंबा दर्शवतील. याआधी प्रियंका वड्रा आणि राहुल गांधी यांनी लखीमपूरला येथे पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. (हेही वाचा: Lakhimpur Kheri Violence: लखीमपुर खीरी हिंसाचाराच्या निषेधार्थ काँग्रेसचे उद्या राजभवनासमोर मौनव्रत आंदोलन)

दरम्यान, मुंबई-ठाणे आणि परिसरातील लोकांसाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे नवी मुंबईचे एपीएमसी मार्केट सोमवारी बंद राहील. पुणे बाजार समितीही बंदमध्ये सहभागी होणार आहे. तसेच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक लासलगाव, धुळे, नंदुरबार, मनमाड, बारामती बाजार समिती देखील बंद राहील. यामुळे भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.