IPL Auction 2025 Live

परळी: पंकजा मुंडे यांच्यावर बिभत्स शब्दांत टीका असलेल्या 'त्या' व्हायरल क्लिपबाबत धनंजय मुंडे यांचा खुलासा

ती क्लिप पूर्णपणे चुकीची असून त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासावी', असे म्हटले आहे

Dhananjay Munde Dhananjay Munde | (Photo Credit-Facebook)

Maharashtra Assembly Elections 2019: भाजप-शिवसेना (BJP-Shiv Sena) युती उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन बिभत्स शब्दांचा वापर करत केलेल्या टीकेबाबतची एक क्लिप व्हायरल झाली आहे. या व्हायरल क्लिबबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केला आहे. आपल्या फेसबुक वॉलवर एक सविस्तर पोस्ट ( Dhananjay Munde Facebook post) लिहून धनंजय मुंडे यांनी खुलासा केला आहे. या पोस्टमध्ये धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की, 'माझ्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावर व्हायरल झालेली ती क्लिप एडिट करून, वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी आहे. ती क्लिप पूर्णपणे चुकीची असून त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासावी', असे म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटले आहे?

'शनिवारी माझ्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावर व्हायरल झालेली ती क्लिप एडिट करून, वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी आहे. ती क्लिप पूर्णपणे चुकीची असून त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासावी.

अशी क्लिप एडिट करणाऱ्यांनी किमान बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा तरी आदर ठेवावा, आपली निवडणूक विकास कार्यावर आहे, ती भावनिकतेवर घेऊन जाताना इतकी खालची पातळी गाठू नका ही कळकळीची विनंती आहे.

मी विरोधासाठी राजकारण करत नाही तर परळीच्या विकासासाठी राजकारण करतोय. या निवडणुकीत आपण फक्त परळीच्या विकासासाठी लढतोय. परळीतील नागरिकांचाही या लढ्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. काही जणांना निकाल लागण्याआधीच पराभवाची भीती वाटू लागली आहे. म्हणून ही विकासाची निवडणूक पुन्हा भावनिकतेच्या मुद्यावर आणण्याचा काहींचा प्रयत्न सुरू झाला आहे. पण हा प्रयत्न व्यर्थ ठरणार हे निश्चित. (हेही वाचा, परळी: वादग्रस्त क्लिप प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल)

मी जे कधी बोललोच नाही त्याच्या खोट्यानाट्या क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत. मी आजपर्यंत कोणाचेही वाईट केले नाही, कोणाचे वाईट चिंतिले नाही. माझ्या विरोधकांबाबत मी कधी अपशब्द देखील वापरला नाही. काहींनी तर मला राक्षस म्हणून हिणवलं पण मी माझे तत्व सोडले नाही. मी कालही तत्वाचे राजकारण करत होतो आजही तत्वाचे राजकारण करत आहे. मी माझ्या १५०० बहिणींचे कन्यादान केले आहे. मी कधीही कोणत्याच महिलेबाबत चुकीच्या शब्दांचा वापर करणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये ही विनंती.'

धनंयजय मुंडे फेसबुक पोस्ट

दरम्यान, ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता (Indian Penal Code) कलम 500,509,294 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप आणि महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याची एक क्लिप परळी विधानसभा मतदारसंघात व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये अत्यंत गलिच्छ व बिभत्स शब्द वापरले गेले आहेत. या क्लिपमध्ये टीका करणारा व्यक्ती हे धनंजय मुंडे असल्याचा आरोप आहे.

व्हायरल झालेल्या 'त्या' क्लिपवरुन भाजपने महिला आयोग आणि निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे. या तक्रारीत धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंकजा मुंडे यांनी प्रचार शृंखलेतील परळी विधानसभा मतदारसंघात शेवटची सभा घेतली. या सभेतील भाषण आटोपून परतताना पंकजा मुंडे यांना सभास्थळी अचानक भोवळ आली. त्या खाली कोसळल्या होत्या.