Maharashtra Assembly Elections 2019 Date and Time: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उरले अवघे काहीच तास; 'या' वेळेत करता येणार मतदान
उद्या सकाळी 7 वाजल्यापासून राज्यात मतदान प्रक्रिया सुरु होणार आहे, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाच्या अवधीत नागरिकांनी आपापल्या मतदारसंघातून आपला कौल द्यायचा आहे.
मागील दोन महिन्यांपासून राजकीय पक्ष, समर्थक व सामान्य नागरिक ज्या दिवसाची वाट पाहात आहेत असा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2019) एक महत्वाचा टप्पा अवघ्या काहीच तासांवर येऊन ठेपला आहे. राज्यातील 288 मतदारसंघांसाठी घेण्यात येणारे मतदान उद्या म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. काल 19 ऑक्टबर सायंकाळी 5 वाजल्यापासून आचारसंहिता लागू झाली असून त्या सोबतच प्रचाराची रणधुमाळी सुद्धा थंडावली आहे, आता मात्र सर्वांचेच लक्ष थेट मतदानाच्या दिवसाकडे आहे. उद्या सकाळी 7 वाजल्यापासून राज्यात मतदान प्रक्रिया सुरु होणार आहे, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाच्या अवधीत नागरिकांनी आपापल्या मतदारसंघातून आपला कौल द्यायचा आहे.
यंदाच्या महाराष्ट्र मुख्यमंत्री पदाच्या चढाओढीत निवडणूक सत्र अगदी उत्साहात सुरु झाले होते. सत्ताधारी पक्षाच्या युती पासून ते विरोधी पक्ष आघाडी पर्यंत इतकेच नव्हे तर अपक्ष उमेदवारांनी सुद्धा पजोरदार प्रचार केला होता. साहजिकच यामुळे उद्या मतदार राजा कोणाच्या हाती आपली सत्ता सोपवतो याबाबत कुतुहूल आहे. निवडणूक प्रक्रियेचं दरम्यान कोणतीही अडचण वा गैरप्रकार होऊ नये यासाठी कालपासूनच राज्यभरात मद्य विक्री बंद ठेवण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, मतदानकेंद्रावर एग्झिट पोल चा उपक्रम देखील निषिद्ध असणार आहे.
धारावी मध्ये तयारी सुरु, पहा
प्राप्त माहितीनुसार यंदा राज्यात मतदानासाठी 95,473 केंद्रांची उभारणी करण्यात आली असून या सर्व केंद्रावणवर एकाच टप्प्यात मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी यंदा राजकीय तसेच सामाजिक संस्थांनी जनजागृती कार्यक्रम राबवले होते तसेच उद्याचा दिवस हा सार्वजनिक सुट्टीचा जाहीर करण्यात आल्याने आपल्या सोयीनुसार सर्वानी आवर्जून मतदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय अपंग मतदारांना PWD ऍप द्वारे मतदानाची मुभा देण्यात आली आहे.
दरम्यान, 2014 सालचे निकाल पाहता 288 पैकी 122 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले होते. तर शिवसेनेला 63 , काँग्रेसला 42 , राष्ट्रवादीला 41 जागा मिळवता आल्या होत्या. यंदा निकाल याच स्तरावर लागणार की यावेळी सत्तेचे पारडे बदलणार हे ठरवण्यासाठी उद्या नक्की मतदान करा.