100 कोल्हे आले तरी 1 सिंहाची शिकार होत नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर पलटवार (Watch Video)
काल म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम (Nagpur South West ) मतदारसंघात घेण्यात आलेल्या सभेत बोलत होते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Elections 2019) आधी सर्वच पक्षांनी एकमेकांवर टीका करत शब्दाचे शस्त्र उगारण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सुद्धा विरोधी पक्षावर निशाणा साधत "असे 100 कोल्हे आले तरी आम्ही एकटेच सिंह आहोत आणि सिंहाची शिकार होत नाही" अशा शब्दात चिमटा घेतला आहे. काल म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम (Nagpur South West ) मतदारसंघात घेण्यात आलेल्या सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधक तुल्यबळ नसल्याने निवडणुकीत मजाच येत नाही असे म्हणत टोलावले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. फडणवीस यांनी भाषणात , “माझ्या विरोधात पळपुटा उमेदवार उभा केला, नितीन गडकरी यांच्याविरोधात पळपुटा उमेदवार उभा केला, अशा पळपुटांना आमच्या विरोधात का उभं करता?, त्याऐवजी चांगला पैलवान उभा करा असा सल्ला विरोधकांना दिला
“आम्ही या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरलो आहोत. परंतु या निवडणुकीत मजाच येत नाही. लहान मुलाला देखील या निवडणुकीचा निकाल काय येईल याची कल्पना आहे. काँग्रेस राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष हताश आणि निराश आहेत. आमच्या विरोधात त्यांनी उमेदवारही उतरवले नाहीत,” असं म्हणत फडणवीस यांनी नागपूर दक्षिण मधील आपले विरोधी उमेदवार आशिष देशमुख यांच्यावर सुद्धा नेम साधला.
देवेंद्र फडणवीस ट्विट
फडणवीस यांनी आपल्या भाषणात महायुतीच्या मागील पाच वर्षातील कामाची उजळणी देखील त्यांनी जनतेसमोर मांडली. “आजवरची सर्वात मोठी कर्जमाफी सध्याच्या सरकारने दिली. 5 वर्षांमध्ये 50 हजार कोटींची विकासकामे पार पडली, अनेक सिंचन प्रकल्पही पूर्णत्वास नेण्यात आले,”असे आलेख सर्वांसमोर मांडत यंदाही आम्हाला महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी नागपूरकरांना केले.
दरम्यान, आज महाराष्ट्रात प्रचार सभांचा जोरदार धडाका सुरु आहे. काही वेळापूर्वीच जळगाव येथे मुख्यमंत्रीच्या उपस्थतीतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली यापाठोपाठ आजच भंडारा जिल्ह्यात देखील मोदी आणखीन एक सभा घेणार आहेत.