Maharashtra Assembly Election 2019 Voting Day: मतदानाच्या दिवशी कंपनी सुट्टी देत नसल्यास 'या' केंद्रावर करा थेट तक्रार

याबाबत कामगार आयुक्तांनी पुष्टी केली आहे.

Representational Image (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) येत्या 21 ऑक्टोबर रोजी सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील सर्व कंपन्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी हा नियम असून त्यानुसार मिळणारी ही सुट्टी भरपगारी देण्यात येणार आहे. अगदीच अपवादात्मक स्थितीत जर का एखाद्या कंपनीला पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्‍य नसेल तर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने मतदानासाठी कर्मचाऱ्यांना निदान दोन ते तीन तासांची भरपगारी सवलत देणे बंधनकारक असणार आहे. मात्र जर का एखादी कंपनी कर्मचाऱ्यांना सुट्टी किंवा सवलत देत नसेल तर मतदारांना जिल्हा कामगार अधिकाऱ्यांकडे थेट तक्रार नोंदविता येणार आहे.

विधानसभा मतदार यादीत ऑनलाईन पद्धतीने ‘असं’ शोधा तुमचं नाव

प्राप्त माहितीनुसार, मतदानाच्या दिवशी दरवेळेस राज्य आणि केंद्र सरकारची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळ ऑफिस, सार्वजनिक उपक्रम, बॅंका कामकाजासाठी बंद ठेवण्यात येतात. यानुसार मतदाराला मतदान वेळेत कधीही जाऊन आपले मत नोंदवता यावे यासाठी ही तरतूद आहे. मात्र जर का कंपनीने सुट्टी किंवा सवलत नाकारली तर साहजिकच पगार कापला जाईल या चिंतेने मतदान करणे टाळले जाईल. असे होऊ नये याकरिता संबंधित बाबतीत तक्रार आल्यास त्या कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजत आहे.

मतदानाच्या दिवशी सुट्टी वा सवलतीबाबत तक्रार करायची झाल्यास, आपण प्रमुख सुविधाकार, बृहन्मुंबई महानगरपालिका व त्यांच्या अधिपत्याखालील महानगरपालिकेतील प्रभागनिहाय कार्यालय, राज्याचे कामगार आयुक्त कार्यालय, कामगार भवन, याठिकाणी संपर्क साधू शकता. याबाबत कामगार आयुक्तांनी पुष्टी केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: PwD App च्या मदतीने दिव्यांग मतदार घरबसल्या करू शकतील मतदार नोंदणी ते व्हिलचेअरसाठी विनंती.

दरम्यान, 21 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणाऱ्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा याकरिता विविध जनजागृती कार्यक्रम, व शिबिरांच्या माध्यमातून जनतेला आवाहन करण्यात आले होते, याचे परिणाम मतदानाच्या दिवशीच समोर येतील.