Lok Sabha Elections 2024: उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांच्या मिरवणुकांवर प्रशासनाची करडी नजर; वाहन, खाद्यपदार्थ, प्रचार साहित्य इ खर्चाची होणार पडताळणी
सर्व संबंधित बाबी पडताळल्यानंतर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार निर्धारित करण्यात आलेल्या दर पत्रकाच्या आधारे वाहन खर्च, खाद्यपदार्थ खर्च, पेय पदार्थ, प्रचार साहित्य इत्यादींसाठीच्या विविध खर्चाचे निर्धारण करावे. जेणेकरून हा खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करता येईल.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections 2024) मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26- मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम, 28- मुंबई उत्तर पूर्व, 29- मुंबई उत्तर मध्य या चार मतदारसंघात शुक्रवार 26 एप्रिल 2024 पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. लोकसभेच्या या निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. ही नामनिर्देशन पत्रे भरतेवेळी उमेंदवारासमवेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते येत असतात. ही बाब लक्षात घेता या मिरवणुकांमध्ये सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या, वाहने, केला जाणारा खर्च इत्यादींची छायाचित्रांसह व व्हिडिओ छायाचित्रणासह सुयोग्य नोंद ठेवण्याचे निर्देश ‘दक्षिण मध्य मुंबई’चे निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोकण विभागाचे अपर आयुक्त विकास पानसरे यांनी दिले आहेत.
यावेळी पानसरे यांनी सांगितले की, नामनिर्देशन पत्रे भरण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांसमवेत असलेल्या कार्यकर्त्यांची संख्या, त्यांच्या वाहनाचे क्रमांक व वाहनांचा तपशील, मिरवणुकी दरम्यान वितरित होणारे खाद्यपदार्थ इत्यादींवर कडक व काळजीपूर्वक लक्ष ठेवण्यात यावेत. याकरिता आवश्यकतेनुसार मुंबई पोलीस दल व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडे असणारे आवश्यक ते सीसीटीव्ही फुटेज देखील काळजीपूर्वक पडताळून पाहण्याचे आदेशही पानसरे यांनी दिले आहेत.
सर्व संबंधित बाबी पडताळल्यानंतर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार निर्धारित करण्यात आलेल्या दर पत्रकाच्या आधारे वाहन खर्च, खाद्यपदार्थ खर्च, पेय पदार्थ, प्रचार साहित्य इत्यादींसाठीच्या विविध खर्चाचे निर्धारण करावे. जेणेकरून हा खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करता येईल. (हेही वाचा: Shivsena UBT Manifesto: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीसाठी सादर केला आपला जाहीरनामा; पहा कोणती आश्वासने दिली)
त्याचबरोबर वाहनांवर झेंडे व प्रचार साहित्य लावण्यासाठी संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी (Assistant Returning Officer) व आरटीओ यांची परवानगी घेणे आवश्यक असते. अशा प्रकारची परवानगी न घेता झेंडे लावल्याचे आढळून आल्यास ती वाहने आचारसंहिता संपेपर्यंत अटकवून ठेवण्याची कारवाई करण्याचे आदेशही आजच्या बैठकीदरम्यान देण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवाराने त्याचा प्रचार करताना केलेला खर्च हा निर्धारित रकमेपेक्षा अधिक आढळून आल्यास भारत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्याचे प्रस्तावित करण्यात येईल. त्याचबरोबर नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या उमेदवारांसोबत जास्तीत जास्त 3 वाहने व 5 व्यक्तींनाच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात येण्याची मुभा आणार आहेर.
(The above story first appeared on LatestLY on Apr 25, 2024 10:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

