Leopard Attack: आरे येथे 14 वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला, एकाच महिन्यातील सहावी घटना
मुंबईतील आरे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून स्थानिकांवर हल्ले केले जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
Leopard Attack: मुंबईतील आरे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून स्थानिकांवर हल्ले केले जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच आता शुक्रवारी रात्री सुद्धा बिबट्याने एका 14 वर्षीय मुलावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. एकाच महिन्यात बिबट्याने हल्ला केल्याची ही सहावी घटना असल्याची माहिती देण्यात आली आहे.(Leopard Attack: गोरेगाव येथील परिसरात 20 वर्षीय तरुणावर बिबट्याच्या हल्ला, जखमी झाल्याने कुपर रुग्णालयात दाखल)
दर्शन सतीश असे मुलाचे नाव असून तो प्रसुती कॉलेजजवळील युनिट 13 येथे राहतो. रात्री सुमारे 9.13 वाजता तो तिच्या मित्रांसोबत जंगलाच्या रस्त्याने जात होता. त्याचे मित्र पुढे गेले असता त्याचवेळी बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. हल्ला केल्यानंतर दर्शन याने आरडाओरड सुरु केली असता तेथे अन्य जण ही धावत आले. बिबट्याला तेथून पळवून लावण्याचा सर्वांनी प्रयत्न केल्याचे शेजारील व्यक्ती आर के शिवा भारती याने सांगितले. मुलावर हल्ला केल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु या मुलाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, याआधी आरे डेअरी येथील विसावा जवळ घराबाहेर बसलेल्या बिबट्याने एका महिलेवर हल्ला केल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. हातात काठी असलेली महिला घराबाहेर येत वरांड्यावर बसते. तोच बिबट्या तिच्यावर हल्ला करतो. महिलेने बिबट्याच्या हल्ल्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या चेहऱ्याला, पाठीला आणि छातीला जखमा झाल्या होत्या. बिबट्याने हल्ला केलेल्या महिलेचे नाव निर्मला रामबदान सिंग असे होते. तर बिबट्याला पकडण्यासाठी जाळ्या सुद्धा लावण्यात आल्याची माहिती वनाधिकाऱ्यांकडून दिली होती.