Konkan Railway Recruitment 2026: कोकण रेल्वेत विविध पदांच्या 201 जागांसाठी भरती, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात अर्ज प्रक्रिया सुरू होणार
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (केआरसीएल) विविध श्रेणीतील एकूण २०१ पदांसाठी भरती अधिसूचना जाहीर केली आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ऑगस्ट २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) विविध विभागांतील एकूण 201 पदांसाठी भरती अधिसूचना (क्रमांक CO/P-R/02/2026) जाहीर केली आहे. 31 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या या अधिसूचनेनुसार, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार असून नेमकी तारीख अर्ज सुरू होण्याच्या सात दिवस आधी जाहीर केली जाईल.
कोकण रेल्वेत कोणासाठी भरती?
कोकण रेल्वेत या भरतीसाठी भूमी बाधित उमेदवार (लँड लूजर), महाराष्ट्र, गोवा किंवा कर्नाटक येथील रोजगार विनिमय केंद्रात नोंदणीकृत उमेदवार, या तीन राज्यांतील रहिवासी उमेदवार आणि किमान तीन वर्षांची नियमित सेवा पूर्ण केलेले केआरसीएल कर्मचारी अर्ज करण्यास पात्र आहेत. कोकण रेल्वे मार्गासाठी ज्यांची जमीन संपादित करण्यात आली, अशा भूमी बाधित उमेदवारांना भरतीत प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. नक्की वाचा: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खाते कधी 'निष्क्रिय' होते? वेळीच समजून घ्याव्यात या 4 महत्त्वाच्या बाबी .
पदे आणि रिक्त जागांचा तपशील
एकूण २०१ पदांमध्ये सिव्हिल विभागात कनिष्ठ अभियंता (२५ जागा) आणि ट्रॅक मेंटेनर (५७ जागा), सिग्नल व दूरसंचार विभागात वरिष्ठ विभाग अभियंता (५ जागा) आणि ईएसटीएम-३ (१५ जागा) यांचा समावेश आहे. ऑपरेटिंग विभागात सेक्शन कंट्रोलर (९ जागा), स्टेशन मास्टर (१५ जागा) आणि गुड्स ट्रेन मॅनेजर (१० जागा) अशी पदे आहेत. इलेक्ट्रिकल विभागात सहायक लोको पायलटच्या ३० जागा, तर मेकॅनिकल विभागात वरिष्ठ विभाग अभियंता (६ जागा), कनिष्ठ अभियंता (७ जागा) आणि तंत्रज्ञ-३ (१५ जागा) अशा जागा आहेत. कमर्शियल विभागात कमर्शियल सुपरवायझरच्या ७ जागा उपलब्ध आहेत.
वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता
गट 'क' पदांसाठी वयोमर्यादा १८ ते ३६ वर्षे, तर ट्रॅक मेंटेनर या पूर्वीच्या गट 'ड' पदासाठी १८ ते ४५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. वय १ ऑगस्ट २०२६ रोजी निश्चित केले जाईल. अनुसूचित जाती व जमाती, इतर मागासवर्ग, अपंग उमेदवार आणि माजी सैनिकांना नियमानुसार वयात सूट देण्यात येणार आहे. प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून, ट्रॅक मेंटेनरसाठी दहावी उत्तीर्ण, तर अभियांत्रिकी पदांसाठी संबंधित शाखेतील पदविका किंवा पदवी आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया
बहुतांश पदांसाठी संगणकाधारित चाचणी (सीबीटी), कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी अशी निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. सेक्शन कंट्रोलर, स्टेशन मास्टर आणि सहायक लोको पायलट या पदांसाठी सीबीटीसोबतच योग्यता चाचणीही घेतली जाईल, तर ट्रॅक मेंटेनर पदासाठी शारीरिक क्षमता चाचणी (पीईटी) अनिवार्य असेल. सीबीटी परीक्षा सप्टेंबर २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे. परीक्षा इंग्रजी, हिंदी, मराठी, कोकणी आणि कन्नड या पाच भाषांमध्ये घेतली जाणार आहे.
परीक्षा शुल्क
सर्वसाधारण उमेदवारांना प्रत्येक परीक्षेसाठी १,१८० रुपये शुल्क भरावे लागेल. अनुसूचित जाती, जमाती, माजी सैनिक, महिला, अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील उमेदवारांना सीबीटीला उपस्थित राहिल्यानंतर हे शुल्क परत केले जाईल.
केआरसीएलने उमेदवारांना केवळ अधिकृत संकेतस्थळ www.konkanrailway.com वापरण्याचा आणि बनावट संकेतस्थळे तसेच नोकरी दलालांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. संस्थेने कोणत्याही एजंट किंवा कोचिंग सेंटरला अधिकृत प्रतिनिधी म्हणून नियुक्त केलेले नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 24, 2026 11:05 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

