Kolhapur North Assembly Constituency: कोल्हापूर उत्तर येथून सतेज पाटील यांना धक्का, काँग्रेसचा पंजा गायब; मधुरिमाराजे छत्रपती यांचा उमेदवारी अर्ज मागे
हा धक्का इतका प्रचंड आहे की, केवळ पाटीलच नव्हे तर तो पक्षालाही मोठा झटका आहे.
कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात काँग्रेस (Congress) पक्ष जोमाने वाढविणारे नेते सतेज पाटील (Satej Patil) यांना ऐन विधनासभा निवडणूक 2024 मध्ये जोरदार धक्का बसला आहे. हा धक्का इतका प्रचंड आहे की, केवळ पाटीलच नव्हे तर तो पक्षालाही मोठा झटका आहे. त्याचे कारण म्हणजे मधुरिमाराजे छत्रपती (Madhurima Raje Chhatrapati). ज्यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली असतानाही त्यांनी अंतिम क्षणी अचानकपणे उमेदवारी अर्जच काढून घेतला आहे. त्याचा परिणाम असा की, महायुतीच्या जागावाटपात मिळालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा (Kolhapur North Assembly Constituency) मतदारसंघात काँग्रेसचा अधिकृत उमेदवारच उरला नाही.
राजू लाटकर यांची बंडखोरी
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने मधुरीमाराजे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, याच मतदारसंघातून काँग्रेसच्याच राजू लाटकर यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. अंतिम क्षणी लाटकर हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील आणि अधिकृत उमेवदाराचा मार्ग मोकळा होईल, असे मानले जात होते. मात्र, लाटकर हे अर्ज मागे घेण्यासाठी आलेच नाहीत. परिणामी राजे घराण्यानेच निवडणूक कार्यालयात दाखल होत चक्क आपलाच उमेदवारी अर्ज मागे घेतला. पक्षाने अधिकृतरित्या उमेदवारी देऊनही माघार घेतल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. (हेही वाचा, Shadar Pawar, Uddhav Thackeray Press Conference: बंडखोरी होणार नाही, झाल्यास कारवाई; उद्धव ठाकरे याचा स्पष्ट इशारा)
अंतिम क्षणी मधुरिमाराजे यांच्या गळ्यात उमेदवारी
राजू लाटकर हे काँग्रेसचे माजी नगरसेवक राहिले आहेत. विधानसभा निवडणूक 2024 मध्ये त्यांनी सुरुवातीला काँग्रेसने त्यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, अंतिम क्षणी निर्णय फिरवत काँग्रेसने मधुरिमाराजे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. परिणामी लाटकर नाराज झाले. आणि त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. महत्त्वाचे म्हणजे, लाटकर हे सुरुवातीपासूनच आपल्या उमेदवारीवर ठाम होते. त्यामुळे त्यांनी अर्ज दाखल केला आणि तो कायमही ठेवला. (हेही वाचा, Manoj Jarange Patil: लढायचं नाही, पाडायचं! मनोज जरांगे पाटील यांची विधासभा निवडणुकीतून माघार)
शाहू महाराज छत्रपती यांची प्रतिक्रिया
दरम्यान, मधुरिमाराजे यांचा उमेदवारी अर्ज मागे गेताना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी प्रसारमाध्यमांसी बोलताना सांगितले की, राजू लाटकर हे चांगले कार्यकर्ते आहेत. ते उमेदवारी मागे घेतील असे आम्हाला वाटत होते. मात्र, त्यांनी शेवटपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे अशा स्थितीमध्ये आम्ही निवडणूक लढविणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे आम्ही आमची उमेदवारी मागे घेतली.
राजे कुटुंबाने पक्षाने अधिकृतरित्या जाहीर केलेली उमेदवारी मागे घेतल्यानंतर सतेज पाटील यांना अत्यंत धक्का बसला आहे. पाटील आणि राजे कुटुंब यांच्यातील शाब्दिक चकमकीचा एक व्हिडिओही प्रसारमाध्यमांतून प्रसारित झाला आहे. ज्यामध्ये पाटील हे उमेदवारी ऐनवेळी पाठिमागे घेतल्यानंतर अत्यंत संताप आणि नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. आता या ठिकाणी काँग्रेस कोणाला पाठिंबा देते याबाबत उत्सुकता आहे.