पुणे बंगळुरू महामार्गावर कोल्हापूर पूरग्रस्त महिलांचे ठिय्या आंदोलन; वाहतुकीची कोंडी (Watch Video)
यंदा पुरामुळे झालेले नुकसान आणि शेतीची दुरावस्था पाहता लवकर मदत मिळावी आणि कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी या महिलांनी केली आहे.
यंदा पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात ओला दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती, यामध्ये सर्वात मोठा फटका हा कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याला बसला होता, या यंदा पुरामुळे झालेले नुकसान आणि शेतीची दुरावस्था पाहता लवकर मदत मिळावी आणि कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी घेऊन आज कोल्हापुरातील महिलांनी पुणे- बंगळुरू महामार्गावर (Pune-Bangalore Highway) ठिय्या आंदोलन पुकारले आहे. आपल्या मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत याठिकाणहून हलणार नाही अशी ठाम भूमिका मांडत या महिलांनी सरकार विरुद्ध निषेध नोंदवला. इतकेच नव्हे तर महामार्गावर ठिय्या घालून रस्त्यालगत चूल पेटवून जेवण करत याठिकाणीच संसार मांडू अशी तंबी देखील दिली. या आंदोलनामुळे महामार्गावरील एका लाईनची वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे महामार्गावर लांबच लांब गाड्यांची लाईन लागली आहे.
कोल्हापुरातील महिलांच्या या आंदोलनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत असून यामध्ये पोलीस प्रशासन त्यांना समजवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे, अगदीच नाईलाआज झाल्याने यापैकी काही महिलाना पोलिसांनी गाडीत बंद करून देखील ठेवले आहे पण जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हटणार नाही असा ठाम पवित्र स्वीकारून महिला सातत्याने घोषणा देत आहेत. आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशी घोषणाबाजी करताना महिलांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारला थेट इशारा दिला आहे.
पहा या आंदोलनाचा व्हिडीओ
(मुंबई हायकोर्टात महाराष्ट्रातील महापुराविरोधात याचिका दाखल)
दरम्यान, या आंदोलनात आणखीन 2000 महिला सामील होणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे, या आंदोलनात जर कोणच्या जीवाचे बरेवाईट झाले तर त्याची जबाबदारी कलेक्टर आणि शिरोळे पोलीस स्थानकाचे अधिकारी यांची असेल असेही महिलांनी म्हंटले आहे.