Kolhapur Bomb Threat Call: सासऱ्याने सांगितला जावयाचा कारनामा, 'दारुच्या नशेत कोल्हापूर अंबाबाई मंदिर परिसरात बॉम्ब ठेवल्याचा फोन'
Ambabai Temple,Ambabai Temple Kolhapur,Kolhapur Ambabai,Kolhapur Bomb Threat Call,Kolhapur Mahalaxmi,Mahalaxmi Temple Kolhapur,अंबाबाई,अंबाबाई मंदिर कोल्हापूर,कोल्हापूर,कोल्हापूरची अंबाबाई,कोल्हापूरची महालक्ष्मी,महालक्ष्मी,महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात बॉम्ब (Kolhapur Ambabai Temple Bomb Threat Call) ठेवल्याचा फोन खणाणला आणि पोलिसांची एकच धावपळ उडाली. मंदिर (Kolhapur Ambabai Temple) सर्व भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले. शोधाशोध सुरु झाली. नंतर बॉम्बच नव्हे तर बॉम्ब सदृश्य कोणती वस्तूही मंदिर परिसरात नसल्याचे शोधा अंती निष्पन्न झाले आणि पोलिसांसह भक्तांचाही जीव भांड्यात पडला. मग हा फोन नेमका कोणी केला? याचा शोध सुरु झाला. आणि मग हा सगळा प्रताप दारुड्या जावयाचा असल्याचे पुढे आले. काय घडले नेमके? वाचा सविस्तर.
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात बॉम्ब ठेवल्याचा फोन पणजी कंट्रोल रुमला गुरुवारी (7 ऑक्टोबर) आला. या फोनची दखल घेऊन कोल्हापूर पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली. बॉम्ब शोधक पथकही कामाला लागले. पण तपासात असे काहीच आढळले नाही. दरम्यान, या प्रकरणात कोल्हापूर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. बाळासाहेब कुरणे आणि सुरेश लोंढे अशी या दोघांची नावे आहेत.धक्कादायक म्हणजे हे दोन्ही आरोपी हे सासरे-जावई आहेत. दोघेही कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव येथील राहणारे आहेत. पोलिसांनी दोघांकडेही कसुन चौकशी केली तेव्हा सासऱ्याने सांगितले की, जावयाने दारुच्या नशेत सासऱ्याच्या फोनवरुन नियंत्रण कक्षाला कॉल केला. (हेही वाचा, Kolhapur Bomb Threat Call: कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात बॉम्ब ठेवल्याचा फोन, पोलीस सतर्क; भाविकांसाठी दर्शन बंद)
घटस्थापनेचा दिवस (7 ऑक्टोबर) असल्याने अंबाबाई मंदिरात भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर सकाळपासूनच रांगा लावून होते. त्यातच कोरोना महामारीमुळे गेले प्रदीर्घ काळ बंद असलेले मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले झाले आहे. त्यामुळे सकाळपासूनच अंबाबाई मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहयाला मिळत होती. आतापर्यंत सकाळपासून सुमारे हजारो भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले आहे. अद्यापही दर्शनासाठी मोठी रांग पाहायला मिळत होती. दरम्यान, बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली आणि एकच धावपळ उडाली.