20 फेब्रुवारीला शेतकऱ्यांचा पुन्हा नाशिक ते मुंबई 'लाँग मार्च'

किसान सभेचा लॉंग मार्च 20 फेब्रुवारीला पुन्हा एकदा मुंबईत धडकणार आहे.

Kisan Sabha Long March [Image: Facebook/CPI(M)]

Kisan Sabha Long March: किसान सभेचा लाँग मार्च 20 फेब्रुवारीला पुन्हा एकदा मुंबईत धडकणार आहे. गेल्या वर्षीही शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी लाँग मार्च काढला होता. मात्र गेल्या वर्षी मान्य केलेल्या मागण्यांची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा लाँग मार्च काढण्याचा निर्णय घेतला आहे. या लाँग मार्चमध्ये शेतकरी 180 किलोमीटरचा नाशिक ते मुंबई हा प्रवास पायी करणार आहेत. 20 फेब्रुवारीला सुरु होणारा हा लाँग मार्च 27 फेब्रुवारीला मुंबईत धडकेल. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लाँग मार्चमध्ये शेतकऱ्यांची संख्या दुप्पट असेल, अशी माहिती किसान सभेने दिली आहे.

संपूर्ण कर्जमाफी आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विविध मागण्या होत्या. गेल्या वर्षी काढण्यात आलेल्या लाँग मार्चनंतर त्या मान्य करण्यात आल्या मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. यंदाच्या लाँग मार्चमध्ये दुष्काळ असल्याने महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्यात येऊ नये, हा मुद्दाही उपस्थित करणार असल्याची माहिती किसान सभेचे आमदार जे.पी. गावित यांनी दिली.

यंदा लाँग मार्चमध्ये ठाणे, नाशिक, पालघर, पुणे यासोबतच मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी सहभाग घेणार आहेत.

अन्यथा महाराष्ट्र बंद

शेतकऱ्यांच्या लाँग मार्चकडे दुर्लक्ष करणे सरकारला महागात पडेल. कारण तसे केल्यास शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी कामगारही आंदोलनात सहभागी होतील. त्याचबरोबर सर्व पक्षांच्या नेत्यांच्या सहकार्याने महाराष्ट्र बंद करण्याचा इशाराही सीटूचे डॉ. कराड यांनी दिला आहे.