Kisan Long March: शेतकरी लॉंग मार्च मध्ये एका शेतकर्याचा मृत्यू; मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाखांची कुटुंबियांना मदत जाहीर
शेतकऱ्यांच्या मागण्यांमध्ये कांदा उत्पादकांना तात्काळ 600 रुपये प्रति क्विंटलची आर्थिक मदत, सतत 12 तास वीजपुरवठा आणि शेतकरी कर्जमाफी आदींचा समावेश आहे.
नाशिक (Nashik) वरून निघालेला शेतकर्यांचा लॉंग मार्च (Kisan Long March) सध्या मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपला आहे. हजारो शेतकरी, कष्टकरी आपल्या मागण्या सरकार समोर मांडण्यासाठी रस्त्यावर उतरल्या आहे. पण यामधील एका आंदोलक शेतकर्याचा मृत्यू झाला आहे. दिंडोरी तालुक्यातील मोहाडी मधील हा शेतकरी आहे. पुंडलिक दादा जाधव असं त्याचं नाव आहे. या शेतकर्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. सरकारकडून या मृत शेतकर्याच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.
मंत्री दादा भुसे यांनी या घटनेची माहिती घेतली आहे. त्यांनी मृत शेतकर्याच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळेल असे सांगितले आहे. दरम्यान काल पुंडलिक जाधव यांना अस्वस्थ वाटू लागल्याने शहापूर ग्रामीण रूग्णालयात त्यांना दाखल केले पण त्यांना डॉक्टर वाचवू शकले नाहीत. नक्की वाचा: Maharashtra Politics: शेतकरी जगला तर राज्य टिकेल, अजित पवारांचे वक्तव्य.
दोन दिवसांपूर्वी सरकारचं शिष्टमंडळ या आंदोलक शेतकर्यांना भेटलं. त्यानंतर विधिमंडळात शेतकरी आणि सरकार यांच्यात बैठक झाली. ही बैठक सकारात्मक झाली. त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यात आला. त्यामुळे मुंबईच्या वेशीवरच शेतकर्यांनी तूर्तास लॉंग मार्च स्थगित केला आहे. पण सरकार जो पर्यंत जीआर काढत नाही तो पर्यंत मागे फिरणार नाही अशी भूमिका शेतकर्यांनी घेतली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांमध्ये कांदा उत्पादकांना तात्काळ 600 रुपये प्रति क्विंटलची आर्थिक मदत, सतत 12 तास वीजपुरवठा आणि शेतकरी कर्जमाफी आदींचा समावेश आहे.