Kirit Somaiya INS Vikrant Case: आयएनएस विक्रांत प्रकरणात किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ, जमा केलेल्या पैशांच्या तपासाचे कोर्टाकडून नव्याने आदेश

यावेळी न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासावर ताशेरे ओढले. तसेच जमा केलेल्या पैशांच्या तपासाचे कोर्टाने नव्याने आदेश दिले.

Kirit Somaiya (Photo Credit: Twitter)

Kirit Somaiya INS Vikrant Case: कथित आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी आज मुंबईतील सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासावर ताशेरे ओढले. आर्थिक गुन्हे शाखेने हे प्रकरण निकाली काढण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. आणि भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांनी ‘सेव्ह आयएनएस विक्रांत’ (INS Vikrant) मोहिमेसाठी जमा केलेल्या पैशाचे काय झालं? असं प्रश्न सत्र न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेला विचारला आहे. याप्रकरणी आणखी तपास करण्याची आवश्यकता आहे, अशी निरीक्षणही न्यायालयाने नोंदवलं आहे. (हेही वाचा: INS Vikrant: किरीट सोमय्या आणि मुलगा नील यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा, 'बाप बेटे तरुंगात जाणार' संजय राऊत यांचा पुनरुच्चार)

न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने म्हटले की, किरीट सोमय्या यांनी या मोहिमेंतर्गत गोळा केलेले पैसे राजभवनात जमा केल्याचे कोणतेही कागदपत्रे तपास अधिकाऱ्यांनी सादर केले नाहीत. परिणामता या पैशांचे पुढे काय झाले? याची कोणतीही स्पष्टता आली नाही.

याशिवाय ही मोहिम महाराष्ट्रातल्या इतर भागातही चालवण्यात आली होती. मात्र, तेथील साक्षीदारांची साक्ष घेण्याची तसदी तपास अधिकाऱ्यांनी घेतली नाही. त्यामुळे हे प्रकरण लगेच निकाल काढता येणार नाही. याप्रकरणी आणखी तपास करण्याची आवश्यकता आहे, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. तपास पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना दिले.

आयएनएस विक्रांत प्रकरण काय?

आयएनएस विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेने1971 च्या भारत पाकिस्तान युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या युद्धनौकेला 1197 साली सेवामुक्त करण्यात आलं. त्यानंतर 2014 साली तिचा ऑनलाईन लिलाव करण्याचा निर्णय सरकारद्वारे घेण्यात आला होता. आयएनएस विक्रांतला या लिलावापासून वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी ‘सेव्ह आयएनएस विक्रांत’ ही मोहिम चालवली होती. या मोहिमेंतर्गत त्यांनी 57 कोटी रुपये गोळा केले होते. हे पैसे राजभवनात जमा करण्यात येतील, असं त्यांनी सांगितले होतं. मात्र, हे पैसे कधी राजभवनात जमा झाले नाही, असा आरोप एका माजी सैनिकाने केला होता.