पुण्याच्या गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमध्ये गर्भाशय प्रत्यारोपणाचा प्रयत्न यशस्वी, चिमुकलीचा जन्म, आशियातील पहिली यशस्वी प्रसुती
पुण्याच्या गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमध्ये शैलेश पुणतांबेकरांसह 17 डॉक्टरांची टीम या शस्त्रक्रियेसाठी प्रयत्नशील होती.
गर्भाशय प्रत्यारोपणानंतर बाळाला यशस्वीरित्या जन्म देणारी पहिलीच घटना पुण्याच्या गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमध्ये घडली आहे. दसर्याच्या मुहूर्तावर एका चिमुकलीचा जन्म झाला आहे. वैद्यकीय शास्त्रातील हा चमत्कार ही आशिया खंडातील पहिलीच यशस्वी शस्त्रक्रिया आहे. यापूर्वी स्वीडन, अमेरिकेमध्ये अशाप्रकारे बाळाचा जन्म झाला आहे.
गॅलेक्सी केअरचे डॉक्टर प्रयत्नशील
18 मे 2018 साली पुण्यात एका महिलेवर तिच्या आईकडून दान करण्यात आलेले गर्भाशय प्रत्यारोपित केले होते. यामध्ये शैलेश पुणतांबेकरांसह 17 डॉक्टरांची टीम काम करत होती. 18 ऑक्टोबर 2018 च्या रात्री 12 वाजून 12 मिनिटांनी बाळाचा जन्म झाला आहे. बाळाचं वजन 1400 ग्रॅम आहे. सिझेरियनद्वारा या बाळाचा जन्म झाला आहे.
जन्मतः गर्भाशय नसलेल्यांना मिळणार नवा आशेचा किरण
जगात 4500 पैकी एका स्त्रीमध्ये गर्भाशय नसते. अशावेळेस प्रत्यारोपणाच्या माध्यमातून स्त्रीच्या शरीरात गर्भाशय प्रत्यारोपण केलं जातं. त्यानंतर आयव्हीएफच्या माध्यमातून गर्भ शरीरात सोडला जातो. मात्र अशाप्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी दातादेखील रक्ताच्या नात्यातील असणं आवश्यक आहे. गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमध्ये गर्भाशय प्रत्यारोपणामध्ये आई होण्याची इच्छा असणार्या तरूणीला तिच्या आईनेच गर्भाशय दान केले होते.