भारत 2027 पर्यंत 3rd Largest Economy बनेल, SBI संशोधन अहवाल

पण भारताने सध्याचा विकासदर कायम ठेवला तर, असे एसबीआयच्या एका संशोधन अहवालात म्हटले आहे.

Largest Economy | Representational image (Photo Credits: pxhere)

भारताचा सध्याचा विकास दर कायम राहिल्यास पुढच्या केवळ तीन वर्षांमध्ये म्हणजेच 2027 (2027-28) देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असा टॅग मिळण्याची शक्यता आहे. तसेच, या कालावधीत भारत जपान आणि जर्मनी या देशांना मागे टाकेल, असा विश्वास एसबीआय रिसर्चने वर्तवला आहे. एसबीआय रिसर्चचा 'Ecowrap' नुकताच प्रसिद्ध झाला. त्यात हा दावा करण्यात आला आहे. भारताने सध्या सन 2014 च्या तुलनेत 7 स्थानांनी वरची पातळी गाठली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

एसबीआयच्या अहवालात पुढे जोर देत असेही म्हटले आहे की, 2022-2027 दरम्यान भारताने केलेली वाढीव वाढ ऑस्ट्रेलियाच्या अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या 1.8 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त असेल. भारत पुढच्या प्रत्येक वर्षात याच दराने USD 0.75 ट्रिलियन जोडण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा आहे की भारत 2047 पर्यंत USD 20 ट्रिलियन पर्यंत पोहोचेल. जीडीपीमध्ये भारताचा जागतिक वाटा जोडून 2027 पर्यंत 4 टक्क्यांच्या पुढे जाईल. भारताच्या GDP मधील वाटा आता 3.5 टक्के आहे. जो 2014 मध्ये 2.6 टक्के होता आणि 2027 मध्ये तो 4 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

राज्यनिहाय निरीक्षण नोंदवताना SBI रिसर्चने म्हटले आहे की , किमान दोन भारतीय राज्ये, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश, 2027 मध्ये अर्थव्यवस्थेच्या बाबतीत USD 500 अब्जचा टप्पा मोडतील. तेव्हा भारत जागतिक अर्थव्यवस्थेत तिसरे स्थान गाठेल. 2027 मध्ये प्रमुख भारतीय राज्यांचा जीडीपी आकार व्हिएतनाम, नॉर्वे आणि इतर काही आशियाई आणि युरोपीय देशांच्या आकारापेक्षा जास्त असेल," असे त्यात म्हटले आहे.