पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवभोजन थाळीचे उद्घाटन

सत्तेत आल्यानंतर गोर गरिबांना 10 रुपयांत पोटभर जेवण मिळेल असे शिवसेना (Shiv Sena) पक्षाने आपल्या वचननाम्यात म्हटले होते.

Ajit Pawar (Photo Credit: Instagram)

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस- राष्ट्रवादी पक्षाने एकत्र येऊन राज्यात महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) स्थापन केली. सत्तेत आल्यानंतर गोर गरिबांना 10 रुपयांत पोटभर जेवण मिळेल असे शिवसेना (Shiv Sena) पक्षाने आपल्या वचननाम्यात म्हटले होते. त्यानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर आजपासून (26 जानेवारी) या योजेनेला सुरवात झाली आहे. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मिळून 11 ठिकाणी शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता पुणे महानगरपालिकेतील उपहार गृहात उद्घाटन कार्यक्रम पार पडला. गरिबांना पोटभर जेवण मिळावे हा यामागचे उद्देश आहे. यामुळे ज्यांची पूर्ण पैसे देऊन जेवण घ्यायची ऐपत आहे, अशांनी या योजनेचा लाभ घेऊ नये असे आवाहन अजित पवार यांनी त्यावेळी केले आहे.

राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यास गरिबांना 10 रुपयांत जेवण उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन शिवसेना पक्षाने जनतेला दिले होते. त्यानुसार महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात या 10 रुपयांच्या थाळीची घोषणा केली होती. दहा रुपयांच्या थाळीसाठी प्रत्यक्षात जवळपास 50 रुपयांचा खर्च येणार असल्याने उर्वरित 40 रुपयांचे अनुदान राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव होता. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर या घोषणेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाने ही योजना राबविण्याऐवजी महापालिका तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील उपाहारगृहात प्रयोगिक तत्त्वावर ही योजना राबवावी, असा प्रस्ताव सादर केला होता. हे देखील वाचा- पोटाला जात-पात, धर्म, अर्थिक स्थितीचे निकष न लावता सर्वांना स्वस्त आणि दर्जेदार आहार मिळावा, हेच शिवभोजन योजनेचे उद्दिष्ट- आदित्य ठाकरे

या योजनेअंतर्गत जेवण घेणाऱ्याचे छायाचित्र, नाव आणि मोबाइल क्रमांक द्यावा लागणारआहे. त्यासाठी शासनाकडून 'महा अन्नपूर्णा' हे अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रत्येक केंद्रात रोज किमान 75 आणि कमाल 150 जणांनाच या योजनेअंतर्गत जेवण देण्यात येईल. रोज दुपारी 12 ते 2 या वेळेतच ही योजना कार्यान्वित राहणार असून एका व्यक्तीला एकच थाळी मिळणार आहे.