Maharashtra Corona Death: महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेत मृत्यूची धक्कादायक आकडेवारी आली समोर, कोणतीही लक्षणे नसलेल्या 'इतक्या' रुग्णांनी गमवला आपला जीव
जेव्हा कोविड डेथ ऑडिट कमिटीने या आकड्याचा बारकाईने अभ्यास केला.
Maharashtra Corona Death: महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा एक लाख 40 हजारांच्या पुढे गेला आहे. मात्र आता राज्यातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जानेवारी महिन्यात राज्यात कोरोनामुळे 1040 मृत्यू झाले आहेत. जेव्हा कोविड डेथ ऑडिट कमिटीने या आकड्याचा बारकाईने अभ्यास केला तेव्हा असे आढळून आले की, यापैकी 58 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. ज्यांना सुरुवातीला कोणतीही लक्षणे नव्हती.
समितीला या अभ्यासात असे आढळून आले की, 58 रुग्ण असे होते ज्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. याबाबत डॉ.अविनाश सुपे म्हणाले की, अभ्यासातून समोर आलेली ही बाब सूचित करते की, कोरोनाचा कोणताही प्रकार सौम्य मानता येणार नाही. (वाचा - COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 67,597 नवे कोरोना रूग्ण; 1,188 मृत्यू)
डॉक्टर सुपे म्हणाले, "अशक्त लोकांच्या विलगीकरणातही निगरानी ठेवणे आवश्यक आहे. कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या मृत्यूची टक्केवारी 5.5 होती." जानेवारीमध्ये, इतर अनेक गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांपैकी 63 टक्के रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. त्याच वेळी, 44 टक्के रुग्णांमध्ये श्वासोच्छवासाचा त्रास दिसून आला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत, बहुतेक प्रकरणे एकतर सौम्य किंवा कमी गंभीर होती, ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नव्हती.
दरम्यान, पहिल्या दोन लहरींपेक्षा तिसऱ्या लाटेत कमी लोकांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या लाटेत ते 2.2 टक्के होते, तर दुसऱ्या लाटेत ते डेल्टा प्रकारामुळे 2.8 टक्के झाले. त्याच वेळी, तिसऱ्या लाटेत, मृत्यूचे प्रमाण केवळ 0.1 टक्के नोंदवले गेले. दुसरीकडे, मुंबईबद्दल बोलायचे झाले तर, महामंडळाच्या आकडेवारीनुसार, 85 ते 88 टक्के कोरोना बाधित रुग्ण कोणतीही लक्षणे नसलेले होते. तथापि, नंतर त्या रुग्णांवर त्याचा काय परिणाम झाला याबद्दल कोणतीही माहिती नाही.
याबाबत डॉ.वसंत नागवेकर म्हणाले की, 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींमध्ये ओमिक्रॉन प्रकारात खूप जास्त ताप आढळून आला. त्याच वेळी, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना ताप क्वचितच दिसून आला. यामुळेच लोकांनी याकडे अधिक गांभीर्याने पाहिले नाही.