Mumbai Rain: मुंबईत पुढील चार दिवस महत्त्वाचे, मुसळधार पावसाचा शक्यता
प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुढील चार दिवस मुंबईत मुसळधार पावसाची (Mumbai Heavy Rain) शक्यता हवामान खात्याकडून (IMD Alart) वर्तविण्यात आली आहे. तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वाऱ्याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई शहर, उपनगरांत शुक्रवारी पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मात्र, शनिवारी आणि रविवारी पावसाने पुन्हा विश्रांती घेतली. काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. (हेही वाचा - Mumbai: धक्कादायक! मालाडच्या मार्वे खाडीत 12 ते 16 वयोगटातील 5 मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, 3 जण बेपत्ता)
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 20 जुलै रोजी बंगालच्या उपसागरावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल आणि 29 जुलै रोजी त्याचे रूपांतर चक्रीय वादळात होईल. ते चक्रीवादळ ओडिशा किनारपट्टीकडून पश्चिम बंगालच्या दिशेने पुढे सरकेल. त्यामुळे महाराष्ट्रासह मध्य भारतात पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात सोमवार, 17 जुलैपासून पाऊस वाढणार असून 22 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहील. प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांत 18 ते 20 जुलै तर पालघर जिल्ह्यात 19 आणि 20 जुलैदरम्यान अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.