Uma Khapre Demands Resignation of Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास रस्त्यावर उतरू; भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांचा इशारा
मात्र, हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत, असं म्हणत भाजप महिला मोर्चाने मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Uma Khapre Resignation of Dhananjay Munde: राष्ट्रवादी नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) सध्या नव्या वादात सापडले आहेत. त्यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणी संबंधित महिलेने ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रारदेखील दाखल केली आहे. या घटनेनंतर भाजप पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास रस्त्यावर उतरु, असा इशारा भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे (Uma Khapre) यांनी दिला आहे.
दरम्यान, या सर्व प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं आहे. मुंडे यांनी आपल्याला दोन पत्नी असल्याचं कबूल केलं आहे. मात्र, हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत, असं म्हणत भाजप महिला मोर्चाने मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (वाचा -Dhananjay Munde's Facebook Post: धनंजय मुंडे यांनी बलात्काराचा आरोप फेटाळला; सोशल मीडिया अकाऊंटवर खुलाशासहीत स्पष्टीकरण)
उमा खापरे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, सामाजिक न्याय खात्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आपण गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकलेली आहे. याचा समाजावर विपरित परिणाम होणार आहे. वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. अन्यथा भाजप महिला मोर्चा आपल्या सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आणि कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन करेल.
धनंजय मुंडे यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी मुंडे याच्यावर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीदेखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.