Howrah-Mumbai Gitanjali Express रुळावरुन घसरली; अकोला येथे झालेल्या दुर्घटनेत जीवितहानी नाही

ही घटना आज सकाळी घडली असून यामार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Howrah-Mumbai Gitanjali Express Derails (Photo Credits: Twitter)

राज्यातील अकोला (Akola) जिल्ह्यात हावरा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस (Howrah-Mumbai Gitanjali Express) च्या गाडीचे डबे रुळावरुन घसरले आहेत. ही घटना आज (मंगळवार, 9 मार्च) सकाळी घडली असून यामार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणताही प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त हाती आलेले नाही. मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या या गाडीचा शेवटचा SLR कोच हा रुळावरुन घसरल्यानंतर मोठा आवाज झाला. ही घटना बोरगाव मंजू (Borgaon Manju) आणि काटेपूर्ना (Katepurna) या दोन स्टेशनदरम्यान झाली. मंगळवारी सकाळी 11.15 मिनिटांनी ही घटना घडल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. (वेगवान एक्सप्रेस ट्रेन खाली बाईकचा क्षणात चक्काचूर झाला; दैव बलवत्तर म्हणून चालक बचावला; पहा काळजाचा ठोका चुकवणारा हा अपघाताचा व्हिडिओ)

ट्रेनचे डबे रुळावरुन घसरल्यानंतर त्वरीत ट्रेन थांबवण्यात आली. यामुळे अप आणि डाऊन मार्गावर जाणाऱ्या सर्व गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वेचे अधिकारी आणि रेल्वे पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. रुळावरुन घसरलेला डबा हा ट्रेनपासून वेगळा करण्यात आला आणि ट्रेन आपल्या पुढील प्रवासासाठी रवाना झाली. या संपूर्ण प्रक्रीयेत सुमारे दोन तासांचा कालावधी लागल्यामुळे ही ट्रेन दोन तास उशिराने धावत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. (रत्नागिरी: खेड-दिवाणखवटी दरम्यान मालवाहतूक करणाऱ्या ट्रेनला अपघात; रुळावरून डबे घसरल्याने मोठं नुकसान)

यापूर्वी देखील रेल्वे ट्रेनचे डबे घसरण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. काही घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी होत नाही. मात्र यामुळे वाहतूक ठप्प होते. सर्व काही सुरळीत होण्यासाठी काही वेळ जातो. परिणामी प्रवाशांना काही त्रासाला सामोरे जावे लागते.