पोलिसांकडून महाबळेश्वर-पाचगणी येथे घोड्यांवर बंदी; घोडेसफारीदरम्यान झाला होता पर्यटकाचा मृत्यू
पर्यटकांच्या सुरक्षेचे कारण देत ही बंदी घातली असल्याचे सांगितले जात आहे
काही दिवसांपूर्वी पाचगणी येथे घोड्यावरून पडून एका पर्यटकाचा मृत्यू झाला होता या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर आणि पाचगणी येथील घोड्यांवर आणि घोडे सफारीवर पोलिसांनी बंदी घातली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेचे कारण देत ही बंदी घातली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता महाबळेश्वर, पाचगणी येथे फिरायला जाणाऱ्या पर्यटकांना घोड्यावर बसून सैर करण्याचा आनंद घेता येणार नाही.
दरवर्षी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये महाबळेश्वर आणि पाचगणी येथे पर्यटकांची फार मोठी गर्दी असते. यात घोड्यावरील सफारी हे मुख्य आकर्षण असते. मात्र आता महाबळेश्वर येथील घोडे व्यवसाय बंद ठेवण्यात आला आहे. घोड्यावरून पडून कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी हेल्मेट, नीपॅडसह अत्यावश्यक गोष्टी व घोडे व्यावसायिकांची नोंदणी, रितसर परवाना देण्याचा अधिकार मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. अरबी समुद्र्रातील बोट दुर्घटना व घोडे दुर्घटना या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर पोलीस अलर्ट झाले असून, वाई उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाबळेश्वर हे एक पर्यटनस्थळ आहे, हिवाळ्यात येथे फार मोठ्या संख्येने पर्यटक हजर होतात, मात्र पोलिसांच्या या निर्णयामुळे पर्यटकांची फार निराशा झाली आहे. मात्र पोलिसांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींची पूर्तता केल्यानंतर काही दिवसांत महाबळेश्वर येथील घोडे व्यवसाय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी दिली. याचसोबत महाबळेश्वरचे वैभव असलेला व पर्यटकांच्या मुख्य आकर्षणाचे ठिकाण असलेले वेण्णालेक येथे नौकाविहारास जाणाºया प्रत्येक पर्यटकास लाईफ जॅकेट, स्पीडबोटसह जीवरक्षक ठेवण्यात यावेत, अशा सक्त सूचना पालिका प्रशासनास देण्यात आल्या आहेत.