मुंबई आणि उपनगरांतील शासकीय कार्यालयांना अतिवृष्टीमुळे सुट्टी जाहीर; मदत व पुनर्वसन विभागाची माहिती

पावसामुळे मुंबईतील सखल भागात गुडघाभर पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली असून घराघरांमध्ये पाणी भरल्याने मुंबईकरांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागली आहे.

Mumbai Rains (Photo Credits: ANI)

सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने मुंबईला (Mumbai) अक्षरश: झोडपून काढले आहे. पावसामुळे मुंबईतील सखल भागात गुडघाभर पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली असून घराघरांमध्ये पाणी भरल्याने मुंबईकरांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागली आहे. अजूनही या भागात पावसाचा जोर कायम असल्याने मुंबईतील सखल भाग पाण्याने भरून गेले आहेत. यामुळे मुंबई व उपनगरांतील सर्व शासकीय कार्यलयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली आहे. याआधी मुंबई महानगपर पालिकेने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन केले होते.

मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई व उपनगरांतील सर्व शासकीय कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला असून खबरदारी म्हणून शासकीय कार्यालये आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणा सुरूच राहणार आहेत, असे माहिती व पुर्नवसन विभागाने सांगितले आहे. तसेच मुंबईतील समुद्रात आज दुपारी 12 वाजून 47 मिंनिटांनी भरती येणार असून 4.45 मीटरच्या लाटा उसळण्याची शक्यात आहे. मुंबईतील नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, समुद्रकिनारे तसेच पाणी भरलेल्या ठिकाणापासून लांब राहावे असे आवाहन मुंबई महापालिकेकडून नागरिकांना करण्यात आले आहे. हे देखील वाचा- अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना बंद ठेवण्याचे मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

मुंबई, ठाणे आणि आसपासच्या भागात काल संध्याकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतूक कोलमडून गेली आहे. मुंबई आणि ठाण्यासाठी रेड अलर्ट असून पुढचे 48 तास असाच मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.