पुण्यात हिंजवडी ते विमानतळ 'एअरपोर्ट एसी बस सेवा' होणार बंद, पुणे महानगर परिवहन महामंडळाचा महत्त्वपुर्ण निर्णय

पीएमपी ची (पुणे महानगर परिवहन महामंडळ) सुरु असणारी हिंजवडी ते पुणे विमानतळ 'एअरपोर्ट एसी बस सेवा' बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

PMC AC Bus (Photo Credits: File Photo)

पीएमपी ची (पुणे महानगर परिवहन महामंडळ) सुरु असणारी हिंजवडी ते पुणे विमानतळ 'एअरपोर्ट एसी बस सेवा' बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विमानतळ प्रशासनाने पीएमपी बसला पार्किंगसाठी जागा दिली नसून त्या परिसरात येण्यावरही बंदी घातली आहे. त्यामुळे पीएमपी बस विमानतळापासून दूर थांबत असल्या कारणाने परिणामी प्रवाशांच्या संख्येत घट होऊ लागली. त्यामुळे या मार्गावरील बस सेवाच बंद करण्याचा निर्णय पीएमपी अधिका-यांनी घेतला आहे.

प्रवाशांना एकाहून एक अशा चांगल्या बससेवा देण्याच्या प्रयत्नात असलेली पीएमपी ने आता एक महत्त्वपुर्ण असा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना वातानुकूलित प्रवास करता यावा, यासाठी पीएमपी प्रशासनाकडून शहरातील काही मार्गांवर एसी बस सेवा सुरू करण्यात आली होती. त्यातीलच एक मार्ग म्हणजे हिंजवडी ते पुणे विमानतळ. मात्र विमानतळ प्रशासनाच्या काही निर्णयाचा फटका या मार्गावरील एसी बस सेवेला बसला. परिणामी या बसचे उत्पन्न घटल्याने या मार्गावरील सेवा बंद करण्याचा निर्णय पीएमपीने घेतला आहे.

हिंजवडी हे आयटी हब असल्याने या ठिकाणावरून विमानतळावर जाणाऱ्यांची संख्या तुलनेने जास्त आहे. यामुळे हिंजवडीवरून ही गाडी सोडण्यात येत होती. मात्र, काही दिवसांपूर्वी विमानतळ प्रशासनाने पीएमपी बसला विमानतळाच्या आत येण्यास बंदी घातली. यामुळे प्रवाशांना बाहेरील गेटवर सोडले जात होते. परिणामी या बसला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

येत्या तीन ते चार दिवसांत या मार्गावरील सेवा पूर्णपणे बंद होणार आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, शहरातून विमानतळाला जाणारी ही एकमेव पीएमपी बस होती. ही बंद झाल्याने पुन्हा एकदा प्रवाशांना खासगी वाहनांकडे वळावे लागणार आहे.

पीएमपीच्या एसी बसला हवे तसे उत्पन्न मिळत नसल्याने पीएमपी ने हिंजवडी ते विमानतळ भाडे 180 रुपयांवरून 110 रुपये केले होते. मात्र तरी देखील प्रवाशांना हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने ही सेवा बंद करण्यात येत आहे.