मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात खाते वाटप न होऊनही घेण्यात आले 'हे' महत्त्वाचे निर्णय
तसेच या बैठकीत मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचं ठरलं आहे. त्याचसोबत या बैठकीत अजून कोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले ते पाहूया.
Decisions Taken By Uddhav Thackeray Cabinet Ministry: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यातील मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं असलं तरी अद्याप मुख्यमंत्री आणि इतर 6 मंत्र्यांनीच शपथ घेतली आहे. तसेच अजून खातेवाटपही झाले नसले तरी या कॅबिनेटची बैठक मात्र पार पडली आणि अनेक मुद्द्यांवर चर्चा देखील झाल्या. तसेच या बैठकीत मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचं ठरलं आहे. त्याचसोबत या बैठकीत अजून कोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले ते पाहूया.
1- मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त 3500 कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय.
2- मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या विविध वित्तीय करारांना मुद्रांक शुल्क माफी.
3- 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा नंतर नियुक्त झालेल्या महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आली.
4- महाराष्ट्र आकस्मिकता निधीची मर्यादा वाढवून आता 5 हजार 350 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता.
5- गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीस प्रभावीपणे आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या कोणत्याही महसुली अधिकाऱ्यास आता अधिकार देण्यात आले आहेत.
दरम्यान, मुंबई- नागपूर दरम्यान बनत असलेल्या समृद्धी महामार्गाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला बदलून आता महाराष्ट्र समृद्धी मार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा नवा निर्णय घेतला आहे.
समृद्धी द्रुतगती महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
विशेष म्हणजे 56 हजार कोटी रुपये खर्च करून मुंबई आणि नागपूर या दोन शहरांमध्ये 710 किलोमीटरचा हा ‘समृद्धी द्रुतगती महामार्गा’ बांधण्यात येणार असून हा प्रकल्प पुढील तीन वर्षांत पूर्ण करण्याचा नव्या सरकारचा प्रयत्न असणार आहे.