Thane Rain Updates: ठाणे शहरात मुसळधार पाऊस, रस्त्यांवर साचले पाणी, वाहतुक कोंडी

Rain | representative pic- (photo credit -pixabay)

ठाणे शहरात मुसळधार पावसाची संततधार (Thane Rain Updates) बरसत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांवर पाणीच पाणी झाले असून अनेक ठिकाणी वाहूतक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत 100 मिमी पेक्षाही अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे सकल भागात पाणी साचले आहे. नागरिकांना कंबरे इतक्या पाण्यातून रस्ता शोधावा लागतो आहे. तर वाहनांचीही स्थिती तशीच आहे. मोठी वाहने कशीबशी रस्ता पार करु शकत आहेत. मात्र, दुचाकी, तिनचाकी वाहने आणि काही छोटी चारचाकी वाहने मात्र पाण्यात अडकून पडताना दिसत आहेत.

मुसळधार पावसाने मुंबई शहर, उपनगरे आणि ठाणे जिल्ह्यालाही झोडपून काढले आहे. संततधार पाऊस सुरुच असल्याने ठाणे शहरातील रेल्वे स्टेशन परिसर, वंदना एसटी डेपो, तलावपाली परिसर, गावदेवी, मुख्य बाजारपेठ, गजानन महाराज चौक, राम मारुती रोड अशा ठिकाणी पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. पाण्याचा निचरा न झाल्याने पाणी अधिक साचले. घोडबंदर रोड, पातलपीपाडा, आनंद नगर, मानपाडा, कावेसर, डीमार्ट परिसर आणि आनंद नगर आदी ठिकाणीही रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. (हेही वाचा, Churchgate - Marine Lines रेल्वे स्टेशनवर पाणी, लोकल सेवेवर कोणताही परिणाम नाही, Watch Video)

संततधार पावसात वादळी वारेही आल्याने अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाहतूकीला अडथळा निर्णाण झाल्याचे पाहायला मिळाले. सकल भागात निवासी वस्त्या असलेल्या नागरिकांच्या घरांमध्येही पाणी घुसले. अनेक ठिकाणी चाळी आणि रस्त्यालगतच्या दुकानांमध्ये पाणी घुसले आहे.

हवामान विभागाने ठाण्यासाठी रेड अलर्ट दिल्यानंतर प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे आज शाळा बंद होत्या. सायकाळी साडेआठनंतर पाऊसाने काहीसा विसावा घेतला. पावसाचा वेग मंदावला. परंतू, तो हलक्या प्रमाणात बरसतच असल्याने पाऊस आणखी किती काळ असाच कोसळत राहणार, अशी चिंता नागरिकांना सतावते आहे. गरज नसल्यास घराबाहेर पडणे टाळा असे अवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.