Gram Panchayat Elections 2021: सोलापूर जिल्ह्यात सरपंच पद आरक्षण सोडतीस ब्रेक, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश
स्थानिक पातळीवर आरक्षण डोळ्यासमोर ठेऊन अनेक नेते, राजकीय मंडळींनी फिल्डिंग लावली होती. परंतू, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सर्वांचे मनसूबे उधळले गेले आहेत.
कोरोना व्हायरस (Coronavirus ) संकटातून सावरत असताना राज्यभरात आता निवडणुकांचा धुरळा उडतो आहे. सोलापूर (Solapur District) जिल्ह्यातली सुमारे 658 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा (Gram Panchayat Elections 2021) धुरळा उडणार आहे. त्यासाठी येत्या 23 डिसेंबरपासून निवडणूक कार्यक्रम जाहीर होतो आहे. दरम्यान, या निवडणूक कार्यक्रमापूर्वीच सोलापूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षण सोडतीचा कार्यक्रमही जाहीर झाला होता. त्यानुसार 16 डिसेंबरला सरपंच पद आरक्षण सोडती जाहीर होणार होत्या. मात्र, या सोडतीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Milind Shambharkar) यांनी स्थगिती दिली आहे. त्याबाबतचे आदेशही प्रशासनाला गेले आहेत.
मिलिंद शंभरकर यांनी दिलेल्या आदेशात आरक्षण सोडतीस देण्यात येणारी स्थगिती ही राज्य सरकारच्या सूचनेवरुनच देण्यात येत आल्याचे म्हटले आहे. स्थानिक पातळीवर आरक्षण डोळ्यासमोर ठेऊन अनेक नेते, राजकीय मंडळींनी फिल्डिंग लावली होती. परंतू, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सर्वांचे मनसूबे उधळले गेले आहेत. (हेही वाचा, Maharashtra Gram Panchayat Election: ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून जिल्हाध्यक्षांना आदेश)
सोलापूल जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम
जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार 30 डिसेंबर हा निवडणूक अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असेल. उमेदवारांच्या अर्जाची छाननी करुन निवडणूक उमेदवारांची यादी 31 डिसेंबरला जाहीर होईल. 4 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. त्याच दिवशी म्हणजे 4 जानेवारी रोजी दुपारी साडेतीन नंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल. 15 जानेवारील मततान आणि 18 जानेवारीला मतमोजणी होईल.