Governor Bhagat Singh Koshyari Letter: विधानसभा अध्यक्ष कधी नेमणार?राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे महाविकासआघाडी सरकारला पत्र
त्यामुळे राजभवन आणि महाविकासआघाडी सरकार यांच्यात चांगलेच मानापमान नाट्य पाहायला मिळत आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारला पत्र लिहीले आहे. या पत्रात विधानसभा अध्यक्ष (Assembly Speaker) पदासाठी निवडणूक केव्हा घेणार आहात अशी विचारणा करण्यात आली आहे. या पत्रावरुन पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. राज्यपाल आणि महाविकासआघाडी सरकार यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसामध्ये फारच ताणलेले आहेत. त्यामुळे राजभवन आणि महाविकासआघाडी सरकार यांच्यात चांगलेच मानापमान नाट्य पाहायला मिळत आहे.
विधानसभा अध्यक्ष नाना पोटोले यांनी आपल्या पदाचा नुकताच राजीनामा दिला आहे. आता ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष पदाचा कार्यभार सध्या नरहरी झिरवळ यांच्याकडे आहे. यावरुनच राज्यपाल कोश्यारी यांनी महाविकासाआघाडी सरकारला पत्र लिहीले आहे. या पत्रात विधानसभा अध्यक्ष नेमण्याबाबत विचारणा करण्यात आली आहे. (हेही वाचा, Governor Bhagat Singh Koshyari: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या सरकारी विमानास परवानगी नाकारली, बुकींग करुन खासगी विमानाने रवाना)
राज्यपालांनी पत्र पाठवून विचारण्यापाठीमाघेही कारण असल्याचे बोलले जात आहे. येत्या 1 मार्चपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. तत्पूर्वीच राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यसरकारला पत्र लिहून विचारणा केली आहे. विधिमंडळातील कामकाजाबाबत राज्यपालांनी विचारणा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा झाल्याचे समजते.
राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात जोरदार संघर्ष सुरु आहे. राज्यपाल नियूक्त 12 जागांसाठी राज्य सरकारने राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवला आहे. गेली प्रदीर्घ काळ हा प्रस्ताव असाच पडून आहे. त्यामुळे राज्य सरकारमध्ये नाराजी आहे. तर राज्यपालांच्या दौऱ्यावेळी राज्य सरकारने त्यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे हा वाद अधिकच तीव्रपणे पुढे आला आहे.
दरम्यान, राज्यपालांच्या पत्रावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. या चर्चेनंतर राज्य सरकारची कोणती भूमिका पुढे येते याबाबत उत्सुकता आहे.