Gold Rate Today: Commodity Market मध्ये सोन्या-चांदीच्या भावामध्ये घसरण; पहा आजचे दर काय

जागतिक पातळीवर सोन्या-चांदीची मागणी कमी झाल्याने या दोन्ही धातूंच्या किंमतीमध्ये घसरण झाली आहे.

Gold | Image For Representation (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये एकीकडे कोरोना परिस्थिती चिंताजनक बनत असताना त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर देखील होताना दिसत आहे. दरम्यान सध्या कमॉडिटी बाजारातील अनिश्चित परिस्थितीमुळे आज सोने, चांदी बाजारला देखील फटका बसलेला आहे. सोन्या-चांदीतील गुंतवणूकदारांनी केलेल्या नफेखोरी मुळे आज (28 एप्रिल) सोनं 300 रूपये तर चांदी 1 हजार रूपयांनी स्वस्त झाली आहे. सोन्याचा भाव 1 तोळ्यासाठी 47 हजारांपेक्षाही कमी झाला आहे. आज सलग 5 व्या सत्रामध्ये सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. पाच सत्रात सोने 1300 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर आज सोन्याचा भाव 46983 रुपये असून त्यात 308 रुपयांची घसरण झाली आहे. एमसीएक्सवर चांदीचा भाव 67881 रुपये असून त्यात1058 रुपयांची घसरण झाली आहे.

तज्ञांच्या मते, जागतिक पातळीवर सोन्या-चांदीची मागणी कमी झाल्याने या दोन्ही धातूंच्या किंमतीमध्ये घसरण झाली आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. सोन्याचा भाव 1767.76 डॉलर प्रती औंस झाला आहे. त्यात 0.5 टक्के घसरण झाली आहे. चांदीचा भाव 26.25 डॉलर आहे.

दरम्यान Goodreturns च्या माहितीनुसार आज मुंबई मध्ये 10 ग्रॅम सोन्याचा दर ₹45,790 इतका आहे तर चांदी प्रतिकिलो 69,000 रूपये आहे. मागील आठवड्यापासून सातत्याने सोन्याच्या दरात घसरण पहायला मिळाली आहे तर चांदीच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे.

पहा रिटेल बाजारातील दर

भारतामध्ये हा सध्याचा काळ हा लग्नसराईचा आहे. मात्र अनेक ठिकाणी लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लादले गेलेले असल्याने आता लग्नामधील धामधूम  कमी झाली आहे. पण काही सराफांनी ऑनलाईन सोने खरेदी, सोन्याच्या दागिन्यांची खरेदी ग्राहकांसाठी सुरू ठेवली आहे.