अमरावती: प्रियकराच्या गुप्तांगावर प्रेयसीने भिरकावला दगड; पीडिताच्या आईची पोलिसात धाव; रक्तबंबाळ तरुणावर ICU मध्ये उपचार

त्याच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभाग (ICU) मध्ये उपचार सुरू आहेत. घडल्या प्रकाराबद्दल पीडित तरुणाच्या आईने गाडगे नगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. आलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी प्रेयसी तरुणीविरुद्ध भादंवि कलम 324, 326 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Boyfriend | (Photo Credits : File Image)

प्रेयसीने (Girlfriend) प्रियकराच्या (Boyfriends) गुप्तांगावर दगडाने मारहाण केल्याची विचित्र घटना घडली आहे. ही घटना अमरावती (Amravati) शहरातील अर्जुन नगर परिसरात घडली. या घटनेत पीडित तरुण रक्तबंबाळ झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभाग (ICU) मध्ये उपचार सुरू आहेत. घडल्या प्रकाराबद्दल पीडित तरुणाच्या आईने गाडगे नगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. आलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी प्रेयसी तरुणीविरुद्ध भादंवि कलम 324, 326 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

घटनेबाबत प्राप्त माहिती अशी की, पीडित तरुण हा एमएस्सीचे शिक्षण घेत आहे. तो अर्जुन नगर परिसरात राहतो. आरोपी तरुणीसोबत त्याचे गेले 3 ते 4 वर्षे प्रेमसंबंध होते. मात्र, प्रेयसीच्या विक्षिप्त वागण्यास कंटाळून त्याने तिच्यासोबतचे प्रेमसंबंध संपवले होते. तसेच, प्रेयसीच्या कचाट्यातून सुटका व्हावी यासाठी त्याने कॉलेजही बदलले. नव्या कॉलेजला प्रवेश घेतला. परंतू, अनेक प्रकार करुनही प्रेयसी त्याचा पिच्छा सोडत नव्हती. धक्कादायक असे की, आरोपी प्रेयसीने पीडित तरुणापाठोपाठ आपलेही कॉलेज बदलले आणि ज्या कॉलेजमध्ये तिच्या प्रियकराने (पीडित तरुण) ज्या कॉलेजला प्रवेश घेतला होता त्याच कॉलेजला प्रवेश घेतला.

दरम्यान, ही घटना घडली त्या दिवशी (मंगळवार, 23 जुलै 2019) रोजी पीडित तरुण हा त्याच्या मित्रांसोबत उभा होता. या वेळी त्याची प्रेयसी (आरोपी) तिथे आली आणि त्याला शिवगाळ करु लागली. सार्वजनिक ठिकाणी उगाच वाद नको म्हणून पीडित तरुणाने तेथून काढता पाय घेतला. तो गाडीवरुन घरी निघाला. दरम्यान, आरोपी तरुणीने पीडित तरुणाच्या गाडीला जोरदार टक्कर दिली. या प्रकारामुळे पीडित तरुण गोंधळून गेला. इतक्यातच आरोपी तरुणीने पीडित तरुणावर जोरदार हल्ला केला. तिने त्याच्या गुप्तांगावर दगडाने जोरदार मारहाण केली. (हेही वाचा, पुणे: नामांकित शाळेत पुरुषाचा प्रायव्हेट पार्ट मिळल्याने नागरिकांमध्ये खळबळ)

तरुणीने गुप्तांगावर केलेल्या मारहाणीचे घाव वर्मी लागल्याने पीडित तरुण रक्तबंबाळ झाला. सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. न्यूज 18 लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, डॉ.बोंडे यांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पीडित तरुणावर उपचार सुरु आहेत.